पुणे : ‘बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील पार्किंगसाठी जागा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आरक्षित करावी,’ असा प्रस्ताव क्रीडा आणि युवक संचलनालयाच्या वतीने देण्यात आला आहे. ‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा रद्द झाल्याने नव्याने तो करताना ही जागा आरक्षित करावी, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे सातत्याने आयोजन होत असते. मात्र, क्रीडा संकुलाला पार्किंगची समस्या भेडसावत आहे. क्रीडा स्पर्धांच्या वेळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यावेळी पार्किंग आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने दुचाकी, चारचाकी मैदान परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुलाच्या जवळील जागा ‘पीएमआरडीए’ने पार्किंगसाठी आरक्षित करावी, अशी मागणी सातत्याने होत होती.
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यात आला आहे. तसे पत्र ‘पीएमआरडीए’ प्रशासनाकडून न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. अद्यापही विकास आराखडा रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये ती पूर्ण होणार आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नव्याने विकास आराखडा करण्यात येणार आहे. बालेवाडी ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत येत असल्याने नव्याने विकास आराखडा करताना पार्किंगसाठी जागा आरक्षित करावी,’ असा प्रस्ताव ‘पीएमआरडीए’ला देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. बालेवाडी क्रीडा संकुलात पार्किंगची समस्या आहे. त्या सोडविण्यासाठी निश्चित उपाययोजना करण्यात येतील.- डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, ‘पीएमआरडीए’