पुणे : कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात विहिरीत पडून सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. साई भगवान यादव (वय ६) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. येवलेवाडीतील अंतुलेनगर परिसरातील विहिरीजवळ साई खेळत होता. विहिरीला बाहेरूुन जाळी बसविण्यात आली आहे. जाळीला असलेल्या फटीतून साई विहिरीत पडत होता. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचेे हवालदार विठ्ठल राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. केंद्रप्रमुख समीर शेख, योगेश जगताप, रवींद्र हिवरकर, अनिल खरात, सोपान कांबळे, शौकत शेख तसेच मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे, विजय शिवतारे यांनी तातडीने मदतकार्य सुरु केले. पाण्यात बुडालेल्या साईला बाहेर काढण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.