पिंपरी : मैत्रीणीला संदेश पाठविल्याच्या रागाने एका तरुणावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात तरुणाच्या डाव्या हाताला आठ टाके पडले आहेत. ही घटना शुक्रवारी खेड तालुक्यातील निघोजे गावाच्या हद्दीतील एका कंपनीत घडली. या प्रकरणी तक्रारदाराने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारदाराला, ‘तू माझ्या मैत्रिणीला संदेश का पाठविलास’ असे विचारले. यावरून त्यांच्या तोंडावर चापट मारत ‘तुला जीवे मारतो’ अशी धमकी दिली. आरोपीने कमरेत लपवून ठेवलेला चाकू काढून तक्रारदाराच्या डाव्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रारदार हे बाजूला सरकल्याने चाकू त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाला लागला आणि त्यात त्यांना आठ टाके पडले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
भोसरीत युनियन प्रतिनिधीकडून कर्मचाऱ्याला मारहाण
एका कंपनीच्या युनियन कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान एका कर्मचाऱ्यावर युनियन प्रतिनिधींनी मारहाण करून अंगावर कचरा फेकल्याची घटना उघडकीस आली. यात कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कार्यालयात युनियन प्रतिनिधींची बैठक सुरू असताना, बैठकीतील आरोपींपैकी एकाने ‘युनियनमध्ये खूप कचरा झाला आहे, तो साफ केला पाहिजे’ असे म्हटले. त्यानंतर बाहेरची कचऱ्याने भरलेली डस्टबिन आणून तक्रारदाराच्या अंगावर टाकली आणि त्यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, इतर दोन आरोपींनी तक्रारदाराला हाताने मारहाण केली आणि एकाने पाण्याची स्टीलची बॉटल डोक्याच्या उजव्या बाजूला मारून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
कंपनीतून काढल्याच्या रागातून माजी कर्मचाऱ्याकडून खंडणीची मागणी
कंपनी प्रशासनाने कामावरून कमी केल्याच्या रागातून एका माजी कर्मचाऱ्याने आपल्याच जुन्या सहकाऱ्याकडे खंडणीची मागणी करत धमकी दिल्याचे उघड झाले आहे. आरोपीने पैशांची मागणी करत त्रास दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी एकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कंपनीत कामावर येत असताना, पूर्वी याच कंपनीत काम करणाऱ्या आरोपीने त्यांचा पाठलाग केला. कंपनीने आपल्याविरोधात मिळालेल्या तक्रारींमुळे कामावरून कमी केल्याचा राग मनात धरून, आरोपीने फिर्यादी यांना धमकावले. ‘तू मला कामावरून काढून टाकले आहे, आता तू पगाराएवढे पैसे दर महिन्याला द्यायचे, नाहीतर तुलाही काम करू देणार नाही आणि तुझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी करीन’ अशी धमकी देत पैशांची मागणी केली. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
दिघीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना दिघी येथे घडली.शीतल रोहन दगडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रोहन विष्णू दगडे (३८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन आणि त्यांची पत्नी शीतल हे दुचाकीवरून जात असताना ट्रकने पाठीमागून दगडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रोहन यांच्या पत्नी शीतल यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. दिघी पोलीस तपास करत आहेत.
काळेवाडीत टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
अज्ञात टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला, ओठाला, डाव्या हाताला आणि डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना काळेवाडी येथे घडली.या प्रकरणी नागेश गणेश डोके (३६) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश हे दुचाकीवरून काळेवाडी फाट्यावरून राहत्या घराकडे जात होते. पाठीमागून आलेल्या टेम्पोने त्यांना पाठीमागून येऊन धडक दिली. या धडकेमुळे नागेश यांच्या डोक्याला, ओठाला, डाव्या हाताला आणि डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.