केंद्र सरकारकडून नियमावलीचा मसुदा जाहीर ; विद्यार्थ्यांना नोंदणी बंधनकारक
‘ऑनलाइन’ अभ्यासक्रमांच्या बाजारावर आता केंद्राने नियंत्रण आणले असून या अभ्यासक्रमांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार आता ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक नोंदवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक आणि व्यावसायिक विद्याशाखांचे ऑनलाइन अभ्यासक्रम चालवता येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
अनेक विद्यापीठे, खासगी संस्थांकडून ऑनलाइन अभ्यासक्रम चालवण्यात येतात. त्यांची प्रमाणपत्रेही दिली जातात. दूरशिक्षणाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून सोयीच्या वेळी अभ्यास करणे किंवा मार्गदर्शन मिळणे या उद्देशाने ऑनलाइन अभ्यासक्रमांची संकल्पना सुरू झाली. मात्र त्यांचे नियमन होत नसल्यामुळे त्यात अनेक गैरप्रकारही व्हायला लागले. या अभ्यासक्रमांतून मिळालेल्या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले. या पाश्र्वभूमीवर ऑनलाइन अभ्यासक्रमांना मान्यता देतानाच त्यांच्यासाठी आता स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे.
या नियमावलीनुसार ऑनलाइन अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक नोंदणीच्या वेळी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षण म्हणजेच अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूरचना या विद्याशाखांचे आणि वैद्यकीय विद्याशाखांचे अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू करता येणार नाहीत. नोकरी करणारे किंवा नियमित पद्धतीनुसार शिकू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांचा प्राधान्याने विचार करून अभ्यासक्रमांची रचना करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या अभ्यासक्रमांना प्रात्यक्षिके किंवा प्रयोगशाळेत काम करावे लागत नाही असेच अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
नियमित अभ्यासक्रमापेक्षा अधिक तीन वर्षे असा कालावधी ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी गृहीत धरण्यात येईल. ज्या शिक्षणसंस्थांना पाच वर्षे झाली आहेत आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन परिषदेकडून (नॅक) ‘अ’ दर्जा मिळाला आहे, अशा संस्था ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करू शकतात. अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या संस्थांना ऑनलाइन अभ्यासक्रमांचा स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यासाठी संचालक आणि इतर नियुक्तया कराव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणेही बंधनकारक आहे.
ऑनलाइन अभ्यासक्रम असे..
- ’नोंदणी आणि परीक्षेसाठी आधार बंधनकारक.
- ’परीक्षेसाठी बायोमेट्रिक किंवा तत्सम पद्धत वापरणे संस्थांसाठी बंधनकारक.
- ’नियमित अभ्यासक्रमापेक्षा अधिक तीन वर्षे कालावधी गृहीत धरणार.
- ’संस्थांनी अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक.
- ’स्वतंत्र अभ्यासक्रमांची रचना.
- ’तंत्रशिक्षण किंवा वैद्यकीय अभ्यासक्रम करता येणार नाहीत.
याबाबतची नियमावली विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) जाहीर केली असून त्यावर एक महिन्याच्या कालावधीत (१८ ऑगस्टपर्यंत) सूचना किंवा अभिप्राय देता येणार आहे. ugc.online2017@gmail.com या आयडीवर इमेल करायचे आहेत.