एमबीए किंवा एमएमएस अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी आवश्यक असलेली शासकीय सामाईक प्रवेश परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ एमबीए एमएमएस इन्स्टिटय़ूटस (अमी) या संघटनेतर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून ही परीक्षा १६ जूनला होणार आहे. अर्जविक्री सोमवारपासून (१३ मे) सुरू होणार आहे, अशी माहिती अमीचे अध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने अमीला स्वतंत्र सीईटी घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. एमबीए किंवा एमएमएस या परीक्षांना प्रवेश घेण्यासाठी सी-मॅट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, ही परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी अमीने संधी उपलब्ध करून दिली आहे. सी-मॅटच्या माध्यमातून प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या जागांवर अमीच्या सीईटीच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या राज्यातील ३५३ संस्था अमीच्या सदस्य आहेत.
अमीच्या सीईटीची अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती १३ मे ते १२ जून या कालावधीमध्ये होणार आहे. या परीक्षेबाबतची अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.