महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नागरिकांना दारू आणि पैशांचे वाटप केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. पक्षाने याबाबत शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.  
सेनापती बापट रस्त्यावरील शिवाजी हाउसिंग सोसायटीजवळ असलेल्या वैदूवाडी या वस्तीत मनसे कार्यकर्ते दारू, बिर्याणी आणि पैशांचे वाटप करताना आढळून आले, असा आरोप ‘आप’ने पाठवलेल्या प्रसिद्धिपत्रकात करण्यात आला आहे. ‘आप’ने नेमलेल्या विशेष निरीक्षकांना हे वाटप होताना आढळून आल्याचेही पक्षाने नमूद केले आहे. पक्षाचे पदाधिकारी रणजित गाडगीळ आणि सव्यसचिन मित्तल यांनी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे ‘आप’तर्फे कळवण्यात आले.