राज्यात अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून पुकारलेला संप मागे घेण्याचे आवाहन धुडकावल्यानंतर महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. अनेक बैठका होऊन देखील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटत नसून आंदोलक संपावर ठाम आहेत. दरम्यान, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे या आंदोलनात तेल ओतण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे. 

अब्दुल सत्तार म्हणाले, “एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यात मध्यस्थी व्हायला पाहिजे आणि त्यातून तोडगा निघायला हवा. राजकीय लोकांनी यात ढवळाढवळ करू नये. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे या आंदोलनात तेल ओतण्याचे काम करत आहेत. त्यांचे सरकार असताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात का विलीनीकरण केले नाही.”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जोपर्यंत ते येत नाहीत आणि कॅबिनेटची बैठक होत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा सुटणार नाही. तसेच हे एक महामंडळ नसून सर्वच महामंडळाचा विचार करावा लागणार आहे.”, असे  अब्दुल सत्तार म्हणाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीला आज २ वर्ष पूर्ण झाली. त्या घटनेवर राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, “थोडा खेळ भाजपाने अजित पवार यांच्याबरोबर खेळला होता पण शरद पवार यांनी तो खेळ २४ तासाच्या आत हाणून पाडला. राजकीय खेळ कसा खेळावा, हे अजित पवार आणि शरद पवार यांना माहिती आहे.”