समाजात उपेक्षितांसाठी अनेकविध उपक्रम राबविले जातात. असे उपक्रम राबविणाऱ्यांना नेहमीच पाठबळाची गरज भासते आणि अशा उपक्रमांना अनेक जण कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून चांगले साहाय्य देखील करतात. पुण्यातील सुहास गद्रे आणि अशोक तुळजापूरकर हे त्यांपैकीच एक. त्यांच्या दातृत्वाची प्रचिती सिंहगड रस्त्यावरील आभाळमाया वृद्धाश्रमाला शुक्रवारी आली.
सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील नॅशनल पार्क सोसायटीनजीक आभाळमाया वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमाच्या संचालिका डॉ. अपर्णा देशमुख असून कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता डॉ. देशमुख यांनी सामाजिक भावनेतून सत्ताविसाव्यावर्षी हा वृद्धाश्रम सुरु केला. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांची जाण डॉ. देशमुख यांना आहे. या वृद्धाश्रमातील काही ज्येष्ठांना त्यांच्या मुलांनी सांभाळ करण्यास नकार दिला आहे. अशांचा सांभाळ डॉ. देशमुख करत आहेत. वृद्धाश्रम चालविताना अनेक अवघड प्रसंगांना डॉ. देशमुख यांना सामोरे जावे लागते. मात्र, त्यांनी उमेद सोडलेली नाही. आर्थिक गणित जुळवण्यासाठी त्या स्वत: एका खासगी रुग्णालयात काम करतात आणि वृद्धाश्रमाला लागणाऱ्या खर्चाची सांगड घालतात. डॉ. देशमुख यांच्या या कार्याची ओळख करून देणारा वृत्तलेख ‘लोकसत्ता’ने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी प्रसिद्ध केला होता
परिघाबाहेर जाऊन आभाळमाया वृद्धाश्रमाच्या माध्यमातून डॉ. देशमुख करत असलेल्या कार्याचे वृत्त अशोक तुळजापूरकर आणि सुहास गद्रे यांनी वाचले. तुळजापूरकर ७८ वर्षांचे असून गद्रे यांचे वय ६६ आहे. त्यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात संपर्क साधून डॉ. देशमुख यांचा मोबाईल क्रमांक घेतला आणि डॉ. देशमुख यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी वृद्धाश्रमाचे काम जाणून घेतले. वृद्धांना उपचारांसाठी रुग्णालयात न्यावे लागते. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी वृद्धाश्रमाकडे रुग्णवाहिका नसल्याचे लक्षात आले. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सुहास गद्रे यांच्या सहकार्याने अशोक तुळजापूरकर यांनी आभाळमाया वृद्धाश्रमाला रुग्णवाहिका भेट देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी शुक्रवारी गुढीपाडव्याच्या दिवशी वृद्धाश्रमाला रुग्णवाहिका भेट दिली. आभाळमाया वृद्धाश्रमाच्या डॉ. अपर्णा देशमुख तसेच वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्ग, ज्येष्ठ नागरिक या प्रसंगी उपस्थित होते. सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी मातु:श्री रजनी भास्कर तुळजापूरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णवाहिका भेट देण्यात आली, असे तुळजापूरकर आणि गद्रे यांनी सांगितले.

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. अशोक तुळजापूरकर आणि सुहास गद्रे यांनी आमच्याशी संपर्क साधला. वृद्धाश्रमाला नेमकी कशाची गरज आहे, हे त्यांनी जाणून घेतले आणि त्यांनी रुग्णावाहिका देण्याचा निर्णय घेतला. त्यांचे आभार शब्दांत मांडता येणार नाहीत.
डॉ. अपर्णा देशमुख, संचालिका, आभाळमाया वृद्धाश्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhalamaya rest home ambulance
First published on: 09-04-2016 at 03:20 IST