एक गंभीर जखमी; अपघातानंतर वाहतुकीची कोंडी

सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला भरधाव पीएमपी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. टिळक रस्त्यावरील अभिनव कला महाविद्यालयाजवळील चौकात शुक्रवारी संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात एक तरुण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

सोहम सुहास भुंजे (वय २५, रा. कर्वेनगर, मूळ रा. सातारा) या तरुणाचा मृत्यू झाला असून, अभिजित रामचंद्र अभिभावी (वय २२, रा. ताकारी, ता. वाळवा, जि. सांगली) हा जखमी झाला आहे. अभिजित हा सोहम याला घेऊन दुचाकीवरून जात असताना अभिनव कला महाविद्यालयाजवळील सिग्नल लागल्याने त्यांनी दुचाकी थांबवली. त्यांच्या मागून पीएमपी बस भरधाव येत होती. चालकाने सिग्नल तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. बस दुचाकीला ओलांडून पुढे जात असताना डिझेलच्या टाकीजवळील बाहेर आलेला पत्रा दुचाकीला अडकला. त्यामुळे दुचाकी फरफटत गेली. दुचाकीवरील दोघेही खाली पडले. पाठीमागे बसलेला सोहम थेट बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर अभिजितच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

अपघातानंतर तरुणाचा मृतदेह सुमारे पाऊण तास बसच्या खाली रस्त्यावरच पडून होता. त्यामुळे टिळक रस्ता व सारसबाग परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीत भरच पडली. मृतदेह व बस हलविल्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीत होऊ शकली.