पुणे : नवले पूल परिसरात सोमवारी दुपारी पुन्हा अपघात झाला. भरधाव कंटेनरने एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक दिली. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नाही. अपघातानंतर मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर कोंंडी झाली. अग्निशमन दल, सिंहगड रस्ता पोलीस, वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी, तसेच स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला नेले. त्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत केली.

बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात गुुरुवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच नवले पूल परिसरात सोमवारी दुपारी पुन्हा अपघात झाल्याने घबराट उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्यवळण मार्गावरुन सोमवारी दुपारी कंटेनरने निघाला होता. तीव्र उतारावर कंटेरन चालकाचे नियंत्रण सुटले आणि एकापाठोपाठ पाच वाहनांना कंटेनरने धडक दिली. वाहने एकमेकांवर आदळल्याने काचा फुटल्या. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, तसेच वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. सुदैवाने या अपघातात कोणी गंभीर जखमी झाले नाही. अपघातानंतर या भागात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

नवले पूल परिसरातील अपघातांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विविध शासकीय यंत्रणांची नुकतीच बैठक घेतली. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या. नवले पूल परिसरात अवजड वाहनांसाठी ३० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली. त्यानंतर सोमवारी दुपारी कंटेनरने पाच वाहनांना धडक दिल्याची घटना घडली.