तरूणीसह तिघे किरकोळ जखमी

ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात तरूणीसह तिघे जण जखमी झाल्याची घटना सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहासमोर बुधवारी दुपारी घडली. ट्रकमध्ये बसलेल्या क्लिनरकडून चुकून अ‍ॅक्सीलरेटरवर  पाय पडल्याने ट्रक पुढे गेला आणि कचरापेटीवर आदळला. तेथून निघालेले तिघे जण जखमी झाले तसेच दुचाकीवाहनांचे नुकसान झाले.

सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहासमोर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला ट्रक लावून चालक खाली उतरला. त्या वेळी ट्रकमध्ये क्लिनर होता. चालकाने ट्रक चालू ठेवला होता. त्यावेळी क्लिनरचा अ‍ॅक्सीलरेटरवर चुकून पाय पडला. ट्रक पुढे गेला आणि कचऱ्याच्या कंटेनरवर आदळला. तेथून निघालेल्या एका तरूणीसह तिघांना ट्रकची धडक बसली. ट्रक कचरापेटीवर आदळल्याने वेग कमी झाला होता. त्यामुळे त्यांना किरक ोळ दुखापत झाली. तेथे लावलेल्या तीन ते चार दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रकचालकाला जाब विचारून चोप दिला.  विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालक आणि क्लिनरला ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.