कंटेनर दुभाजकावर आदळल्याने दोन वाहनांचे नुकसान
पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात रविवारी रात्री झालेल्या दोन अपघातात भरधाव ट्रकने ४८ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी दुपारी पुन्हा किरकोळ अपघात झाला. भरधाव कंटेनर दुभाजकावर आदळल्याने दोन वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही.
हेही वाचा >>> पाणीकपात रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आंदोलन
बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात रविवारी रात्री दोन वेगवेगळे अपघात झाले. ट्रकने ४८ वाहनांना धडक दिली. अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला; तसेच १३ जण जखमी झाले. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. बाह्यवळण मार्गावरील अपघातानंतर यंत्रणांना खडबडून जाग आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने सोमवारी बाह्यवळण मार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला. या उपाययोजना सुरू असतानाच मंगळवारी (२२ नोव्हेंबर) बाह्यवळण मार्गावर किरकोळ अपघात झाला. भरधाव कंटेनर दुभाजकावर आदळला. या घटनेत दोन वाहनांचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले. क्रेनच्या सहायाने ट्रक तसेच वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.