खाकी वर्दीच्या मागे देखील एक माणूस असतो, हे आपण अनेकदा ऐकलं असेल. पण अशा काही घटना समोर येतात, ज्यामुळे हे फक्त बोलण्याचं वाक्य नसून प्रत्यक्ष वास्तव असल्याचं मनोमन पटल्याशिवाय राहात नाही. अशीच एक घटना पुण्यातल्या कोथरूड परिसरातील वारजे पुलावर घडली असून त्यामध्ये वर्दी किंवा जातीधर्मापलीकडे देखील माणूसपण अजूनही जिवंत असल्याची साक्ष पटली आहे. रमजानचे रोजे सुरू असताना देखील एका मुस्लीम धर्मीय पोलीस कर्मचाऱ्यानं ८ वर्षांच्या चिमुकलीचे प्राण वाचवण्यासाठी कशाचीही पर्वा केली नसल्याचं या घटनेतून समोर ालं आहे.

नेमकं झालं काय?

दरवर्षी प्रमाणे सध्या रमजान महिना सुरू आहे. हा उपवास प्रत्येक मुस्लिम बांधव करीत असतो. त्यांच्यापैकीच एक समीर बाग सिरीज यांचा देखील महिनाभर उपवास असून देखील त्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना वारजे पुलावर झालेल्या अपघातामधील ८ वर्षांच्या चिमुकलीला खांद्यावर नेऊन रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि तिचा जीव वाचवला आहे.या त्यांच्या कामगिरीमुळे समाजात त्यांचं विशेष कौतुक केलं जात आहे.
कोथरूड परिसरातील मनोज पुराणिक हे कुटुंबिया सोबत वारजे पुलावरून प्रवास करीत असताना पुराणिक यांच्या चार चाकी वाहनाला ट्रकने मागून जोरात धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात गाडीत असलेले मनोज, त्यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाले. या अपघाताच्या घटनेमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्याचदरम्यान तिथे वाहतूक पोलिस कर्मचारी समीर बाग सिरीज ड्युटीवर होते. तेथील परिस्थिती लक्षात घेता, समीर रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या ८ वर्षांच्या मुलीला खांद्यावर घेऊन रूग्णालयाच्या दिशेने पळत सुटले.

समीर यांना जखमी चिमुकलीला खांद्यावर घेउन जात असताना पाहून बाजूने जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने त्यांना थांबवलं आणि रिक्षातून येण्याची विनंती केली. त्यावर समीर बाग सिरीज यांनी काही मिनिटांत त्या चिमुकलीला रूग्णालयात दाखल केले. वेळीच ते धावून आल्याने
चिमुकलीचे प्राण वाचले असून पुराणिक कुटुंबीयांनी त्यांचे विशेष आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कामगिरीबाबत समीर बाग सिराज यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी वारजे पुलाजवळ ड्युटीवर असताना अपघात झाल्याचे दिसले. गाडीजवळ जाऊन पाहिले तर चौघेजण जखमी असल्याचे दिसले. काही सुचेनासे झाले. तेव्हा गाडीतील ८ वर्षांच्या मुलीला उपचारासाठी घेऊन धावत सुटलो. तेव्हा एका रिक्षा वाल्याने मदत केल्याने रूग्णालयापर्यंत पोहोचू शकलो. त्या बाळाचे प्राण वाचले याचे समाधान असून समाजात अशा घटना घडल्यास नागरिकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.