शरीरसंबंधाला नकार दिल्यामुळे पन्नास वर्षीय महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी मुंढव्यातील केशवनगर येथे घडली. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
विजया दिलीप हरपलकर (वय ५०, रा. श्रीकुंज अपार्टमेन्ट, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खुनाच्या आरोपावरून विकास हनुमंत कदम (वय ३३) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ते लष्करातून निवृत्त झाले होते. आरोपी हा विजया यांच्या नात्यातील आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तो त्यांच्याच घरी राहण्यास आहे. विजया यांना एक मुलगी असून ती शिकत आहे. विजया यांनी त्यांच्या दोन मोटारी कॉल सेंटरला भाडय़ाने लावल्या होत्या. त्याचे काम विकास पाहात होता. राहण्यास विजया यांच्याच घरी असल्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याला नातेवाईकांनी अनेक वेळा आक्षेप घेतला होता. गुरुवारी विजया यांची मुलगी घरी येणार असल्यामुळे विजया यांनी विकासला शरीससंबंधाला नकार दिला. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यात विकासने त्यांचा गाळा दाबून, मारहाण करून खून केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र चव्हाण हे अधिक तपास करत आहेत.