पिंपरी : किवळे येथील बेकायदा लोखंडी जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा फलक काढण्यास सुरुवात केली खरी, पण ही कारवाई अतिशय संथ गतीने सुरू आहे. गुरुवारी दिवसभरात केवळ चारच फलक काढण्यात आले. दरम्यान, महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ६५ हून अधिक बेकायदा जाहिरात फलक आढळले आहेत.

किवळे येथील दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लोखंडी जाहिरात फलक (होर्डिंग) धारकांना संरचना मजबुतीचे (स्थिरतेचे) प्रमाणपत्र आणि जाहिरात फलकाच्या आकाराचे छायाचित्र पाठविण्यास सांगितले. जाहिरात फलक धारकांना खडे बोल सुनावले. शहरात ४३३ बेकायदा लोखंडी फलक असल्याची महापालिका दफ्तरी नोंद आहे. त्याचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. पण, याव्यतिरिक्तही शहराच्या विविध भागात बेकायदा फलक आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ६५ हून अधिक बेकायदा जाहिरात फलक आढळले आहेत.

हेही वाचा… वर्चस्व राहण्यासाठी सांगवीत हवेत गोळीबार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फलकांमुळे अपघात होण्याची भीती आहे. किवळेतील दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने जाहिरात फलकांवरील कारवाई हाती घेतली. पण, कारवाईचा वेग संथ आहे. आकाशचिन्ह व परवाना विभागाने गुरुवारी शहरातील बेकायदा फलक, बोर्ड काढण्याच्या कामास सुरुवात केली. मुंबई-बंगळुरु सेवा रस्ता, हिंजवडी रोड येथील दोन आणि ताथवडेतील पवारनगर येथील एक असे केवळ चारच बेकायदा फलक दिवसभरात काढले आहेत. बेकायदा जाहिरात फलकधारक स्वतःहून फलक काढत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ८१ लाखांची फसवणूक

महापालिकेने बेकायदा जाहिरात फलक काढण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या सर्वच भागातील बेकायदा फलक काढण्यात येणार आहेत. – नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका