हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांना चौकात अडवून सुरू झालेल्या कारवाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देण्याची सूचना दिल्यानंतर रस्त्यावरील कारवाई थांबली. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईला आता वेग देण्यात आला आहे.

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, तसेच रस्ते अपघातांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे. १ जानेवारीपासून हेल्मेट वापरणे बंधनकारक असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर हेल्मेट न वापरणारे तसेच नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू झाली. या कारवाईला हेल्मेट विरोधी कृती समितीने विरोध केला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हेल्मेटची कारवाई काहीशी शिथिल झाली. निवडणुका पार पडताच पुन्हा कारवाईने वेग घेतला.

गेल्या महिन्याभरापासून पुणे शहर परिसरात हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर पुन्हा तीव्र कारवाई सुरू झाली. चौकाचौकात थांबलेले पोलीस हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करू  लागले. शहरातील प्रमुख चौकांसह रस्त्यावर कारवाई सुरू झाल्यानंतर पुन्हा नागरिकांनी विरोध केला. आमदार माधुरी मिसाळ यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिले. फडणवीस यांनी रस्त्यावरील कारवाई स्थगित करा, दुचाकीस्वारांना अडवून कारवाई करण्यापेक्षा नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करा, असे आदेश दिले. त्यानंतर चौकाचौकात थांबून दुचाकीस्वारांवर होत असलेली कारवाई शिथिल करण्यात आली.

रस्त्यावरील कारवाई शिथिल करण्यात आली असली तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नियमभंग करणे तसेच हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई तीव्र करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेतील सूत्रांनी दिली.

वाहतूक पोलिसांचे सापळे अदृश्य

हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात सापळे लावले होते. या सापळ्यात दुचाकीस्वार अडकायचे. कारवाईला विरोध देखील व्हायचा. त्यामुळे चौकाचौकात दररोज वाहतूक पोलीस आणि दुचाकीस्वारांमधील कुरबुरीचे दृश्य पाहायला मिळायचे. गेल्या तीन दिवसांपासून चौकाचौकात कारवाई करणाऱ्या पोलिसांचे सापळे अदृश्य झाले आहेत.

आठ लाख दुचाकीस्वारांवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या सहा महिन्यात वाहतूक  पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई तीव्र केली आहे. प्रत्यक्ष चौकात करण्यात आलेली कारवाई तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे करण्यात आलेली कारवाई अशी एकूण मिळून आठ लाख दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. जानेवारी ते एप्रिल महिना अखेरीपर्यंत प्रत्यक्ष आणि सीसीटीव्ही कारवाई अशी एकूण मिळून सात लाख दुचाकीस्वारांवर कारवाई झाली होती.