रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची ३० एप्रिलची अंतिम मुदत संपल्यानंतर आता जुनेच मीटर असणाऱ्या रिक्षांची वाहतूक अनधिकृत ठरणार असून, अशा रिक्षांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, दिलेल्या मुदतीमध्ये शहरातील सुमारे ३७ ते ३८ हजार रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यात आले आहेत.
राज्यभरातील रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करण्याचा निर्णय झाल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नोंदणीसाठी येणाऱ्या नव्या रिक्षांना मार्च २०१२ पासून  इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करण्यात आले. त्यानंतर १ मे २०१२ नंतर जुन्या रिक्षांचे इलेक्ट्रॉनिक मीटरशिवाय नूतनीकरण न करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मीटर न बसविणाऱ्या रिक्षांवर आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर हे मीटर बसवून रिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे प्रमाण वाढले.
इलेक्ट्रॉनिक मीटरला रिक्षा संघटनांकडून विरोध करण्यात येत होता. त्यामुळे अनेक रिक्षा नूतनीकरणासाठी आणल्या जात नव्हत्या. मात्र, आरटीओकडून इलेक्ट्रॉनिक मीटरबाबत कठोर भूमिका घेण्यात आली. ३० एप्रिल ही इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती.  
सध्या शहरातील बहुतांश रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर लागले असले, तरी काही रिक्षा जुन्याच मीटरवर धावत आहेत. अशा रिक्षांवर कारवाई करण्यात येत आहे. मुदत संपल्यानंतरही रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविला नसल्यास सुरुवातीला दोन हजार रुपये दंड व परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.