अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकवर औंध येथे बुधवारी पहाटे पाच वाजता हवेली अपर तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने कारवाई केली. कारवाईनंतर तीनही ट्रक जप्त करण्यात आले असून ट्रक मालकांना चार लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपर तहसीलदार किरणकुमार काकडे यांनी ही माहिती दिली. अपर तहसील कार्यालयाचे पथक औंध भागात गस्त घालत असताना औंध येथे अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक सोलापूरकडून आल्याचे या पथकाच्या लक्षात आले. भरारी पथकाचे प्रमुख संजय भोसले यांनी ट्रकचालकांकडे वाळूच्या पावत्या मागितल्या. मात्र त्यांच्याकडून त्या मिळाल्या नाहीत. ट्रक क्रमांक एमएच – १३ केपी ३३१२ हा ट्रक नवनाथ चौधरी यांच्या मालकीचा आहे. तर एमएच १२ एमपी ५२२२ हा ट्रक नितिन धरणे यांच्या मालकीचा असून एमएच १४ बीजे २५०० हा ट्रक चंद्रकांत अडसूळ यांच्या मालकीचा आहे.

कारवाईनंतर हे तीनही ट्रक जप्त करून प्रांत कार्यालयामध्ये जमा करण्यात आले आहेत. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू होती की नाही हे तपासण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला कळविण्यात आले आहे. भरारी पथकामध्ये अव्वल कारकून संजय भोसले, भोसरी मंडल अधिकारी पाटील, चिंचवडचे दुबे, तलाठी चडचणकर आणि कोतवाल सुजित कांबळे यांचा समावेश होता.

दरम्यान, आकुर्डी येथील हवेली तहसील कार्यालयाने १ एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळात अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या ९५ वाहनांवर कारवाई करून ३९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशी वाहने पकडण्यासाठी आठ पथके स्थापन करण्यात आली आहेत. यावर्षी आतापर्यंत नऊ वाहनांवर कारवाई करून चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार काकडे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on illega sand mining
First published on: 28-07-2016 at 04:48 IST