पुणे : शहरातील रस्त्यांवर बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या जाहिरातफलकांवर कारवाई करून ते काढून टाकण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. याचप्रमाणे गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन महाविद्यालय) रस्त्यावरील पदपथांवर अतिक्रमण करत रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे महापालिकेने काढून टाकली.

नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील आर्यभूषण पंपिंग स्टेशन, खंडोजीबाबा चौक, बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) रस्ता, तसेच जंगली महाराज रस्त्यावरील पदपथांवर अतिक्रमण करून बेकायदा पद्धतीने गॅस सिलिंडरचा वापर करणारे, खाद्यपदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक, तसेच खेळणी, कटलरी, होजिअरी व्यावसायिकांबाबत महापालिकेला तक्रारी मिळाल्या होत्या. महापालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता तेथे अनधिकृतपणे व्यवसाय केले जात असल्याचे उघडकीस आले.

नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यासह जंगली महाराज रस्त्यावरील पदपथांवर होत असलेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्कील होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने या दोन्ही रस्त्यांवरील बेकायदा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत त्यांच्या वस्तू जप्त केल्या. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डेक्कन पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

सहायक महापालिका आयुक्त तिम्मया जंगले, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक संजय कुंभार, सहायक अतिक्रमण निरीक्षक रवी जाधव, शरद पवार, भरत बिरादार यांच्या पथकाने नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर कारवाई केली. यामध्ये २२ कपडे पथारी व्यावसायिक, २१ गॅस सिलिंडर, नऊ शेड यांच्यावर कारवाई करून ते काढून टाकण्यात आले. कारवाई पथकामध्ये महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे (एमएसएफ) सहा जवान, १० बिगारी सेवक, एक ट्रक, एक पिंजरा यांचा समावेश होता. या दोन्ही रस्त्यांसह शहरातील इतर भागांतही अशी कारवाई केली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, तसेच जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात येतो. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात पदपथांवर केल्या जाणाऱ्या अतिक्रमणांवर चर्चा झाली होती. या मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या दोन्ही रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या कारभारावर शंका उपस्थित केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील रस्त्यांवरील पदपथांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याने जाणाऱ्या पादचारी, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यापुढील काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्याचा आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. – संदीप खलाटे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग