मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत माहिती घ्यावी, अशा सूचना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नायडू रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. ज्या देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव झाला आहे, तेथून आपल्याकडे प्रवास करून आलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

या आजाराचे आतापर्यंत ११ देशांमध्ये ९२ रुग्ण आढळले आहेत. मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवात पसरलेला एक विषाणू आहे. तो प्राण्यांपासून माणसांत किंवा माणसापासून माणसांत पसरू शकतो. त्वचेद्वारे किंवा श्वासोच्छ्वासाद्वारे त्याचा प्रसार होतो. यामध्ये ताप येणे, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दोन ते चार आठवड्यांपर्यंत राहतात. प्रवासी गेल्या २१ दिवसांमध्ये जर प्रादुर्भावग्रस्त देशांत जाऊन आले असतील आणि त्यांना ताप, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे असतील, तर विलगीकरण करून त्यांचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सूचना प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नायडू रुग्णालय हे संसर्गजन्य रोगांच्या रुग्णांवर उपचार करणारे महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे. स्वाइन फ्लूपासून करोनापर्यंतचे सर्व रुग्ण येथेच प्रथम दखल करण्यात आले. या ठिकाणी विलगीकरण कक्षदेखील आहे. राज्याच्या साथरोग विभागाला राष्ट्रीय रोगनिवारण केंद्राकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार राज्याने सर्व जिल्ह्यांना आणि महापालिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
मंकीपॉक्सबाबत नायडू रुग्णालयाला सूचना देण्यात आल्या आहेत. असे रुग्ण आढळलेच, तर त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार करण्यात येतील. तशी सोयदेखील तेथे उपलब्ध आहे. – डॉ. संजीव वावरे, सहायक साथरोग अधिकारी, पुणे महापालिका