पुणे : देशातील सुमारे ६० टक्के शहरी लोकसंख्येला, तर एकूण लोकसंख्येपैकी १२ टक्के नागरिकांना आतड्यांच्या आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. कंट्री डिलाईट आणि इंडियन डायटेटिक असोसिएशनने केलेल्या सर्वेक्षणात या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. दहापैकी सात भारतीयांना दिवसातून एकदा पचनासंबंधी तक्रारी जाणवत असल्याचेही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

जहांगीर हॉस्पिटलच्या वतीने ही माहिती देण्यात आली. आतड्यांच्या तक्रारीत सातत्याने वाढ होत असून, ‘अत्याधुनिक एंडोस्कोपी’ विभागात गेल्या तीन वर्षांपासून आतड्यांच्या विविध आजारांवर निदान करण्यात येत असल्याचेही रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

‘जहांगीर हॉस्पिटलने पोटाच्या आजारांवरील उपचारांसाठी आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. रुग्णालयाच्या एंडोस्कोपी विभागात ‘एक्सेरा ३ व्हिडिओ एंडोस्कोपी’ प्रणाली (१९० सिरीज एंडोस्कोप) वापरून आतड्यांच्या आजारांचे निदान करण्यात येते. या तंत्रज्ञानामुळे अधिक स्पष्ट प्रतिमा, ड्युअल फोकस आणि हाय-कॉन्ट्रास्ट नॅरो बँड इमेजिंग प्राप्त होते. त्यामुळे पोट आणि मोठ्या आतड्यातील सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग, पॉलिप्स सहज ओळखता येतात. अनेकदा ‘बायोप्सी’चीही गरज राहत नाही,’ असे जहांगीर रुग्णालयाच्या एंडोस्कोपी विभागाचे संचालक डॉ. परिमल लवाटे यांनी सांगितले.

‘या तंत्रज्ञानामुळे आतड्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातील गाठी शस्त्रक्रियेशिवाय काढणे शक्य होते. तसेच ‘इंटिग्रेटेड वॉटर जेट’मुळे रक्तस्रावासारख्या प्रक्रियेदरम्यान अधिक स्वच्छ प्रतिमा मिळायला मदत होते. त्याने ‘एंडोस्कोपिक अल्ट्रासोनोग्राफी’ करताना पोटातील सूक्ष्म गाठी, पित्तनलिकेतले लहान खडे आणि ५ मिमी पेक्षा कमी आकाराचे ट्यूमर शोधणे सहज शक्य होते. तसेच ‘ईयूएस – फाईन नीडल अस्पिरेशन’द्वारे कर्करोगाचे अचूक निदान करता येते. ‘पॅनक्रियाटिक सिस्ट’ किंवा पित्ताशयातील अडथळे दूर करण्याच्या जटिल उपचारांमध्येही हे तंत्रज्ञान उपयोगी ठरत आहे,’ असेही लवाटे यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी शेकडो रुग्ण रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने उपचार घेतात. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेचा धोका कमी होतो. पारंपरिक शस्त्रक्रियेमुळे होणारा त्रास टाळता येतात.

डॉ. परिमल लवाटे, संचालक, एंडोस्कोपी विभाग, जहांगीर हॉस्पिटल