पुणे शहरात सुरू असलेल्या टोळी युद्धाचा बीमोड करण्यासाठी पुणे पोलिसांनी पावले उचलली असून, कुख्यात गजा मारणे आणि नीलेश घायवळ टोळीच्या नाडय़ा आवळण्यास सुरूवात केली आहे. मारणे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केल्यानंतर घायवळ टोळीतील तेरा जणांना पुणे जिल्ह्य़ातून एक वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी दिले आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून मारणे व घायवळ या टोळ्यांमध्ये वाद सुरू होते. मारणे टोळीने घायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडे याचा ३ नोव्हेंबर २०१४ रोजी लवळे येथे अत्यंत क्रूर पद्धतीने खून केला होता. त्यानंतर एका महिन्यात मारणे टोळीने पुन्हा घायवळ टोळीतील गुंड अमोल बधे याचा वैकुंठ स्मशानभूमीजवळ गोळ्या घालून खून केला होता. वर्चस्वातून टोळी युद्ध शहराच्या मध्य भागापर्यंत येऊन पोचल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पोलीस आयुक्तांना टोळी युद्ध चिरडून टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. या दोन्ही खुनाच्या गुन्ह्य़ात मारणेसह त्याच्या साथीदारांना शहर व ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही गुन्ह्य़ांत गजा मारणे व त्याच्या टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याबरोबरच त्याच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली. मारणे याची पत्नी लोकसेवक असल्यामुळे त्यांच्या संपत्तीची चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू केली होती.
मारणे टोळीचे कंबरडे मोडल्यानंतर पोलिसांनी घायवळ टोळीवर लक्ष केंद्रित केले. गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी नीलेश घायवळ टोळीतील तेरा जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला. घायवळ टोळीतील या तेरा गुंडांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यामुळे पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी त्यांना पुणे पोलीस आयुक्तालय आणि जिल्ह्य़ातून एक वर्षांसाठी तडीपार केले आहे. यामध्ये ज्ञानेश्वर दगडू तोंडे (वय २६, रा. खेचरे, ता. मुळशी), विजय उर्फ उज्वल मारूती चौधरी (वय ३५, रा. हनुमाननगर, कोथरूड), योगेश तुकाराम सांबरे (वय ३०), संजय बबन सकट (वय २९, दोघेही रा. गुजरात कॉलनी, कोथरूड), नीलेश हरिचंद्र शर्मा (वय २५, रा. सुतार चाळ, कोथरूड),  पंकज राम फाटक (वय १९), मंगेश भगवान कोंढाळकर (वय २५) विक्रांत चंद्रकांत कोकाटे (वय २९), रमेश भास्कर राऊत (वय ३२), सचिन बन्सीलाल घायवळ (वय ३३), उमेश उर्फ दादा मोहन किरवे (वय ३१), रुपेश किसन अमराळे (वय २५, आठही रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि दीपक रमेश आमले (वय २५, रा. सागर कॉलनी, कोथरूड) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी, दरोडा, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे, धमकी देणे, जबरी चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After marane gang action on ghaiwal gang
First published on: 11-04-2015 at 03:25 IST