मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर तसेच राज्य सरकारकडून सारथी संदर्भातील मागण्या मान्य करण्यात आल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आज सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं आहे. तसेच, सारथी संस्थेशी संबंधित असलेल्या जे.पी. गुप्ता या अधिकाऱ्यास हटवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर संभाजी राजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत याबद्दल माहिती दिली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावने ही संस्था प्रस्थापित झाली होती. सामान्यातील सामान्य मराठा समाजातील तसेच, कुणबी समाजातील माणसाला फायदा व्हावा, या उद्देशाने बार्टीच्या आधारावर ही संस्था निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून आमची मागणी होती की, या संस्थेची स्वायत्तता राहणे आवश्यक आहे.
मात्र, या ठिकाणी असलेल्या गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याने राष्ट्रपती राजवट असताना परिपत्रक काढले, अनेक जीआर काढले होते. ज्याबद्दल मुख्यमंत्र्यांना देखील त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्याची हकालपट्टी करावी, अशी देखील आमची मागणी होती. याचबरोबर परिहार सारखा चांगल्या अधिकाऱ्यास पुन्हा इथे रूजू करावे ही देखील आम्ही मागणी केली होती.
मला आनंद आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला काहीवेळापूर्वी यासंदर्भात फोन केला, तसेच राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी देखील सरकारच्यावतीने या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत, असं आम्हाला आश्वासन दिलं आहे. याबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करतो.