आघारकर संशोधन संस्थेत नवीन द्राक्षवाणाची निर्मिती

आघारकर संशोधन संस्थेतर्फे गहू, सोयाबीन आणि द्राक्ष या पिकांचे उत्तम वाण तयार करण्यासाठी संशोधन केले जाते.

आघारकर संशोधन संस्थेतील द्राक्षफळ पीक संशोधन प्रकल्पातून एआरआय ५१६ या नवीन द्राक्षवाणाची निर्मिती करण्यात आली.

मनुका, ज्यूस, वाईन आणि जॅम निर्मितीसाठी वाण उत्तम

आघारकर संशोधन संस्थेतील अखिल भारतीय समन्वित द्राक्ष फळ- पीक संशोधन प्रकल्पाअंतर्गत एआरआय ५१६ या नवीन द्राक्षवाणाची निर्मिती करण्यात आली आहे. निळसर काळ्या रंगाची ही द्राक्षे दिसायला आणि चवीला करवंदासारखी असून ‘कटावबा’ आणि ‘ब्यूटी सीडलेस’ या दोन द्राक्ष जातींच्या संकरणातून विकसित करण्यात आली आहेत.

आघारकर संशोधन संस्थेतर्फे गहू, सोयाबीन आणि द्राक्ष या पिकांचे उत्तम वाण तयार करण्यासाठी संशोधन केले जाते. त्या संशोधनातून रंगरुप आणि चवीच्या बाबतीत करवंदाशी साधम्र्य असलेले हे वाण तयार करण्यात आले आहे. नीरा-बारामती रस्त्यावरील होळ या गावी आघारकर संशोधन संस्थेचे संशोधन क्षेत्र आहे. तेथे या वाणाची निर्मिती करण्यात आल्याचे आघारकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. किशोर पाकणीकर यांनी सांगितले.

उत्पादन क्षमता आणि रोग प्रतिकारक शक्ती या दोन्ही आघाडय़ांवर हे द्राक्षवाण चांगल्या क्षमतेचे असल्याने नेहमीच्या द्राक्षांप्रमाणे प्रचंड औषध फवारणी करावी लागत नाही. हे वाण खाण्यासाठी उत्कृष्ट असून उत्तम प्रतीच्या मनुका, ज्यूस, वाईन आणि जॅमच्या निर्मितीसाठी त्याचा वापर करणे शक्य आहे.

आघारकर संशोधन संस्थेच्या आनुवंशिकी व वनस्पती पैदास विभागाच्या डॉ. सुजाता तेताली म्हणाल्या, की गेली अनेक वर्षे द्राक्ष वाणामध्ये संशोधन करुन चांगल्या प्रतीचे तसेच रोगप्रतिकारक वाण तयार करण्यावर आम्ही संशोधन करत आहोत. रसासाठी उपयुक्त म्हणून एआरआय ५१६ या वाणाची निर्मिती करण्यात आली आहे. पंजाब कृषी विद्यापीठातर्फे ‘पंजाब एमसीएस पर्पल’ या नावासह उत्तर भारतात लागवडीसाठी या द्राक्षवाणाची शिफारस केली आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे वाण भरपूर उत्पन्न देणारे असून आघारकर संशोधन संस्थेतर्फे शेतकऱ्यांसाठी या वाणाची रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

द्राक्षाची वैशिष्टय़े

  • या वाणाची द्राक्षे निळसर काळ्या रंगाची असून गोल मण्यांच्या आकारातील आहेत.
  • ही द्राक्षे तयार होण्यासाठी १०० ते १२० दिवस लागतात.
  • रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने त्यांच्यावरील उत्पादन खर्च देखील कमी आहे.
  • या द्राक्षांमध्ये बी असून सध्या सीडलेस वाण विकसित करण्यावर संशोधन सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Agharkar research institute new vineyard creation

ताज्या बातम्या