शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कचऱ्यावरून विरोधकांकडून कोंडीत पकडण्यास सुरुवात झाली आहे. हा प्रश्न सोडविण्यात भाजपला अपयश येत असल्याचा आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेबरोबरच भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनेही सत्ताधाऱ्यांविरोधात गुरुवारी आंदोलन केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला असून पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका भवनात गुरुवारी आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्याच्या पाश्र्वभूमीवर कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यासंदर्भात ग्रामस्थांसमवेत बैठकांचे सत्र प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. मात्र बैठका निष्फळ ठरत आहेत. या पाश्र्वभूमीवर कचरा प्रश्नाचे राजकीय पडसादही शहरात उमटले होते. हा प्रश्न निर्माण झाला असताना महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट हे परदेश दौऱ्यावर गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले होते. सत्ताधारी भाजपवर टीका होत असतानाच हा प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनेही सुरु झाली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका भवनातील हिरवळीवर आंदोलन केले. सरकारच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कचरा प्रश्न सोडविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ नाही, असा आरोपही या वेळी करण्यात आला.

भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही आंदोलन करण्यात आले. शिवसेनेकडून कचराफेको आंदोलन करण्यात आले. महापौर आणि पालकमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका करतानाच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शिवसेनेचे महापालिकेतील गटनेता संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनांमुळे अस्वच्छता

शहरात कचरा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याचे राजकीय पडसादही शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून महापालिका भवनात, महापौरांच्या निवासस्थानापुढे तसेच अन्य ठिकाणी कचराफेको आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही महापालिकेच्या हिरवळीवर आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने अस्वच्छता निर्माण झाल्याचे दिसून येत असून अस्वच्छतेत आणखी भर पडली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation against pune garbage issue pmc mns congress ncp bjp
First published on: 05-05-2017 at 03:10 IST