दीर्घकाळ रेंगाळलेल्या पुणे शहराच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी (२८ डिसेंबर) अभिरूप आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात भाजपतर्फे पीएमआरडीएची स्थापना झाल्याचे तसेच म्हाडासाठी अडीच एफएसआय मंजूर झाल्याची घोषणा केली जाईल.
भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी ही माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ,  सरचिटणीस संदीप खर्डेकर, प्रा. श्रीपाद ढेकणे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. पुण्यातील अनेक प्रश्न दीर्घकाळ रेंगाळले असून या प्रश्नांबाबत पुण्यात येऊन सर्व आमदारांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. अधिवेशन संपल्यानंतर पुण्यात येऊनही मुख्यमंत्र्यांनी अशी बैठक घेतलेली नाही. पुण्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी यापूर्वीही अनेकदा आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. मात्र, बाबा आणि दादांच्या वादात पुणेकर वेठीस धरले जात आहेत, असे बापट म्हणाले.
या दिरंगाईबद्दल शासनाचा निषेध करण्यासाठी शनिवारी स्वारगेट (पीएमपी), विधान भवन (पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण), म्हाडा कार्यालय (म्हाडासाठी अडीच एफएसआय), राजाराम पूल (नदीसुधारणा योजना) आणि एसआरए कार्यालय(झोपडपट्टी पुनर्वसन) येथे भाजपतर्फे आंदोलन केले जाईल. त्या त्या कार्यालयाशी संबंधित सर्व प्रश्न सुटल्याचे या वेळी कार्यकर्ते जाहीर करतील व शासनाचा निषेध करतील, असे शिरोळे यांनी सांगितले.