पुणे : नागरिकांना अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात, यादृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) सर्व विभागप्रमुख आठवड्यातील दोन दिवस नागरिकांच्या भेटीसाठी पूर्ण वेळ कार्यालयात उपलब्ध असणार आहे. त्यानुसार नागरिकांना दर सोमवारी आणि गुरुवारी अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.
या निर्णयाची गेल्या काही दिवसांपासून ‘पीएमआरडीए’मध्ये अंमलबजावणी करण्यात येत असून, महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी तसे आदेश काढले आहेत. राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कार्यालयीन स्तरावर काही निर्णय घेण्यात आले. त्यातील हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समन्वय राहावा, या उद्देशाने आठवड्यातील पूर्ण दोन दिवस (सोमवार आणि गुरुवार) महानगर आयुक्त यांच्यासह सर्व विभागप्रमुख कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार आहे. यामुळे नागरिकांना आपल्या अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडण्याची संधी मिळेल, असे डाॅ. योगेश म्हसे यांनी सांगितले.
दरम्यान, ‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने स्थळ पाहणी, तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यासाठी बुधवार आणि शुक्रवार निश्चित करण्यात आला आहे. यासह विभागप्रमुखांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी यांना भेटण्यासाठी मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.