धनगर जमातीला लागू असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याच्या भावनेतून धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी ठिकठिकाणी आंदोलन केले. बारामती येथून सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत.
बारामती येथे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी उपोषण आंदोलन तातडीने मागे घ्यावे असे आवाहन केले. मंगळवारी (२९ जुलै) समोरासमोर बसून चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रमजान ईदचा सण असल्याने व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये, असा निर्णय कोअर कमिटीने घेतला. आरक्षणाच्या मागणीसाठी बारामती येथे २१ जुलैपासून १६ कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपोषणकर्त्यांशी पोलिसांनी रविवारी रात्री हुज्जत घालण्याच्या केलेल्या प्रयत्नातून बाचाबाची झाली. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली असून २५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. बारामतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून राज्य राखीव पोलीस दलाचे १० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.
पंढरपूर येथील सोनके गावामध्ये कार्यकर्त्यांनी रात्री दोन वाजता एसटी बस जाळली. चौघांना अटक करण्यात आली असून पोलिसांमुळे गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रास्ता रोको करीत २०० कार्यकर्त्यांनी भिगवण (ता. इंदापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा नेत अटक करवून घेतली. जालना, माळशिरस, सांगोला येथे मधुकर पिचड, वसंत पुरके, पद्माकर वळवी या नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जुलैपासून चार कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू असून मंगळवारी १०० जण मुंडण करणार आहेत. लोणी काळभोर, राहू, चौफुला आणि पाटस (ता. दौंड) येथे सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर राजीनामे देण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे.