पिंपरी- चिंचवड: महाराष्ट्रात महायुतीचा धर्म पाळणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीने आगामी महानगरपालिकेत स्थानिक पातळीवर स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील महायुतीमध्ये फूट पडल्याचं बोललं जातं आहे. पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीआधी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी शत प्रतिशतचा नारा दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी देखील अजित पवारांसाठी पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर सत्ता आणायची असल्याचा उल्लेख केला आहे.
३१ जानेवारी २०२६ आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात नुकतेच न्यायालयाने आदेश दिले आहेत. या आदेशानंतर तरी राज्यात महानगरपालिका निवडणूका पार पडतील अशी आशा स्थानिक नेत्यांना लागली आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकवरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आत्तापासूनच शड्डू ठोकला आहे. दोन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर स्वबळाचा नारा दिला आहे.
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, “आमची १२८ जागांवर लढण्याची तयारी आहे. सर्व ताकदीचे उमेदवार आहेत. प्रत्येक प्रभागात आम्ही जनसंवाद करत आहोत. पिंपरी- चिंचवडमध्ये भाजप चे चार आमदार आहेत. प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात ताकदीने काम करतील. शेवटी महायुतीत लढायचं की नाही हे राज्यपातळीवर जेष्ठ नेते ठरवतील. परंतु, सध्या शत प्रतिशत भाजप असा नारा दिला आहे.”
राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे म्हणाले, “प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो. आम्ही प्रयत्न करत आहोत. पिंपरी- चिंचवड शहरात सत्ता आणायची आहे. अजित पवारांनी या शहरावर नेहमीच प्रेम केलेलं आहे. शहराचा विकास हा अजित पवारांनी केला आहे.”
राज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आहे. अस असलं तरी आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष महायुती म्हणून लढणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. महत्त्वाची महानगर पालिका मानली जाणारी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेसाठी स्थानिक नेत्यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. आता यावर वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे आगामी काळात स्पष्ट होईल.