Ahmednagar Kalyan Highway Accident : पुण्यात कल्याणीनगर येथे हिट अँड रनचा प्रकार घडल्यानंतर पुण्यात अशाच प्रकारे आणखी अपघात घडले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी येथेही हिट अँड रनचा भीषण अपघात घडला होता. अहमदनगर-कल्याण रोडवर जुन्नर येथे १८ जुलै रोजी पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवर बसलेले पती-पत्नी अशरक्षः हवेत उडाले आणि गाडीच्या पुढे जाऊन पडले. कारचालकाने काही अंतरावर ब्रेक मारल्यामुळे दोघांच्या अंगावर गाडी गेली नाही. मात्र दुचाकीवरील पती-पत्नीला जबर मार लागला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला असून यामध्ये नेमकी चूक कुणाची? असा प्रश्न आता उभा राहत आहे.

काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघात पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथे असलेल्या कल्याण-नगर रोडवर घडला. यावेळी रस्त्यावर असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये सदर घटना कैद झाली. अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी थोडक्यात बचावले. त्यांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे वाचा >> मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, टेम्पोची ट्रकला धडक, एक ठार

व्हिडीओमध्ये काय दिसले?

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, अपघातग्रस्त दुचाकी रस्त्याच्या डाव्याबाजूने चाललेली आहे. काही सेकंदात मागून एक भरधाव कार येताना दिसते. मात्र तेवढ्यात दुचाकीस्वार आपली लेन बदलून उजव्या बाजूला वळण्याचा प्रयत्न करतो. भरधाव कार अतिशय जवळ आली असताना दुचाकी वळली आणि अतिशय भीषण असा अपघात घडला. कारने मागून धडक देताच दुचाकीवरील पती-पत्नी हवेत उडून कारच्या बोनेटवर आदळून रस्त्याच्या बाजूला पडतात.

रस्त्या लगत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन्ही बाजूंची दृश्य दिसत आहेत. गाडीची धडक देताना आणि दुचाकीस्वार खाली पडलेले असताना दोन्ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये पाहता येऊ शकतात. पोलीस या घटनेची चौकशी करत असून भरधाव कारमधील चालकाची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

हे ही वाचा >> पुण्यात पुन्हा अपघात! भरधाव वेगाने येणारी कार दुभाजक तोडून गरवारे सर्कलवरुन खाली कोसळली, Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंत्यविधीच्या गर्दीत भरधाव ट्रक शिरला

दरम्यान शुक्रवारी (१९ जुलै) जुन्नर येथेच एक भीषण अपघात घडला. अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या नागरिकांच्या गर्दीत नगरकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक शिरला. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू, तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावरील गुळंचवाडी (ता. जुन्नर) येथे घडला.