scorecardresearch

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान समस्तर प्रवेशांसाठी ‘एआयसीटीई’कडून सुधारित पात्रता जाहीर

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तंत्रज्ञान (बी.टेक) आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला थेट द्वितीय वर्षांत समस्तर पद्धतीने (लॅटरल एन्ट्री) प्रवेश घेण्यासाठीची सुधारित किमान पात्रता जाहीर केली आहे.

पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तंत्रज्ञान (बी.टेक) आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला थेट द्वितीय वर्षांत समस्तर पद्धतीने (लॅटरल एन्ट्री) प्रवेश घेण्यासाठीची सुधारित किमान पात्रता जाहीर केली आहे. पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाला ४५ टक्के किमान गुण आवश्यक असून, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रम पदवीच्या समस्तर पद्धतीने प्रवेशासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदवी (बी.व्होक) अभियांत्रिकी पदविका, विज्ञान शाखेतील पदवीला समकक्षता देण्यात आली आहे.

पदविका आणि पदवीधर विद्यार्थ्यांना सध्याही समस्तर पद्धतीने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. मात्र एआयसीटीईने समस्तर पद्धतीने प्रवेशांच्या सुधारित पात्रतेसंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार किमान व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम, पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना समस्तर पद्धतीने प्रवेश घेता येऊ शकतो. त्यात दोन किंवा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा ४५ टक्के गुणांसह विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी उत्तीर्ण, व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेत किंवा संबंधित क्षेत्रात पदविका (डी.व्होक) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रम पदवीच्या समस्तर पद्धतीने प्रवेशासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदवी आणि विज्ञान शाखेतील पदवीला समकक्षता देण्यात आल्याचे एआयसीटीईचे सल्लागार डॉ. रमेश उन्नीकृष्णन यांनी नमूद केले आहे.

पदवी आणि पदविकाधारक विद्यार्थ्यांना आताही समस्तर पद्धतीने प्रवेश दिला जातो. मात्र आता बी.व्होक अभ्यासक्रमाला पदविका आणि पदवीची समकक्षता देण्यात आल्याने अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे प्रवेश काही प्रमाणात वाढू शकतील.

– डॉ. मनोहर चासकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aicte announces revised eligibility engineering technology level admissions ysh