संजय जाधव
पुणे : मागील काही दिवसांपासून शहरातील वायुप्रदूषणाची पातळी वाढली आहे. शहरात शिवाजीनगर भागात सोमवारी हवा गुणवत्ता निर्देशांकाने (एक्यूआय) २७१ची उच्चांकी पातळी गाठली. प्रदूषित हवेमुळे श्वसनविकाराचे रुग्ण १० टक्क्यांनी वाढले आहेत. खोकला आणि श्वसनास त्रास होण्याचे प्रमाण वाढले असून, काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता सरासरी १५२ होता. शिवाजीनगर भागात तो सर्वाधिक २७१ नोंदविण्यात आला. त्यामुळे पुण्यातील हवेने मध्यम ते खराब पातळी गाठल्याचे समोर आले. या खराब हवेमुळे सामान्य नागरिकांना श्वसनास किरकोळ त्रास आणि दमा व हृदयविकार असलेल्यांना श्वसनास गंभीर त्रास होऊ शकतो. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे प्रदूषणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात श्वसनविकाराचे रुग्ण आणखी वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
आणखी वाचा-काय सांगताय? पुण्यापेक्षा पिंपरीत स्वस्त कपडे?
वायुप्रदूषणाचा सर्वाधिक धोका पाच वर्षांखालील मुले आणि वृद्ध व्यक्तींना आहे. याचबरोबर गर्भवती प्रदूषित हवेच्या संपर्कात आल्याने गर्भावर परिणामही होऊ शकतात. दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींनाही जास्त धोका निर्माण होऊ शकतो. वाहतूक पोलीस, वाहतूक स्वयंसेवक, बांधकाम कामगार, रस्ते सफाई कामगार, रिक्षाचालक, रस्त्यावरील विक्रेते आणि प्रदूषित वातावरणात घराबाहेर काम करणारे लोक यांनाही प्रदूषणाचा मोठा धोका आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
वायुप्रदूषणामुळे श्वसनविकाराचे रुग्ण वाढले आहेत. खोकला आणि श्वसनास त्रास होत असल्याच्या तक्रारी घेऊन रुग्ण येत आहेत. मागील काही दिवसांपासून अशा रुग्णांच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी प्रदूषित हवेत जाताना मास्कचा वापर करायला हवा. -डॉ. संजय गायकवाड, प्रमुख, श्वसनविकार विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय
प्रदूषित हवेचे दुष्परिणाम
- वारंवार खोकला
- छाती घरघर
- डोळे, नाक, घशात जळजळ
- अस्वस्थता वाटणे
- श्वसननलिकेचे आजार
काय काळजी घ्यावी…
- प्रदूषित हवेत जास्त काळ राहणे टाळा
- बाहेरील शारीरिक श्रम अथवा व्यायाम टाळा
- बाहेर जाताना मास्कचा वापर करा
- लहान मुले, वृद्धांची अधिक काळजी घ्या
- श्वसनास त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या
