पिंपरी महापालिकेतील सत्ता हातातून जाऊन नऊ महिने लोटले असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:ख कमी झालेले नाही. २५ वर्षांहून अधिक काळ पिंपरी-चिंचवड आणि अजित पवार असे राजकीय समीकरण आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून शहर राष्ट्रवादीचा कारभार अजित पवारांकडे आहे. सुरुवातीला काँग्रेसला सोबत घेऊन व नंतर स्वतंत्रपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात पिंपरी महापालिकेची सूत्रे होती. मात्र, फेब्रुवारीमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. फक्त तीन नगरसेवक असणाऱ्या भाजपने राष्ट्रवादीचेच सैन्य वापरून त्यांची धुळधाण उडवत ७७ नगरसेवकांपर्यंत बाजी मारली. ‘गुरूची विद्या गुरूला’ परत करून झालेला तो पराभव अजित पवार यांच्यादृष्टीने अनपेक्षित आणि धक्कादायक होता. या पराभवाने प्रचंड नाराज झालेले अजित पवार जवळपास चार महिने शहराकडे बिलकूल फिरकले नव्हते. चिंचवडला राष्ट्रवादीचा राज्यव्यापी मेळावा झाला, तेव्हा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमवेत आलेल्या अजित पवार यांनी तेव्हाही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. महापालिकेतील सत्तांतरास सहा महिने पूर्ण झाले, तेव्हा ते पुन्हा सक्रिय झाले. शहराच्या राजकारणात त्यांनी पुरेसे लक्ष घातले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची कामे होत नाहीत, राष्ट्रवादीच्या काळात मंजूर झालेली आणि काही प्रमाणात पूर्ण झालेली कामे जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याची तक्रार स्थानिक नेत्यांनी त्यांच्याकडे केली, तेव्हा पालिका मुख्यालयात येऊन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत त्यांनी बैठक घेतली. राष्ट्रवादीच्या कामांची जंत्री सादर करून, ही कामे पूर्ण करण्याची सूचना करत वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काळेवाडी ते पिंपरी दरम्यान काढलेल्या ‘जन हाहाकार’ आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले आणि आता रविवारी (२६ नोव्हेंबर) त्यांनी आकुर्डी ते प्राधिकरण कार्यालय दरम्यान ‘हल्लाबोल’ आंदोलनाचे नेतृत्व केले.

पिंपरीत नियोजनशून्य कारभार आहे. प्रशासनावर कोणाचा अंकुश राहिला नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली. अनधिकृत बांधकामे, शास्तिकर प्रकरणी जनतेची फसवणूक केली जात आहे. संरक्षण खात्याचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. सर्व जुनीच कामे सुरू आहेत. ‘बेस्ट सिटी’ म्हणून गौरव झालेल्या शहराची आज दुरवस्था आहे. पाणीपुरवठा विस्कळीत आहे. निगडीपर्यंत मेट्रो सुरू करण्याचा निर्णय होत नाही. नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे. सरकारकडे असलेले प्रश्न अनुत्तरित आहेत, अशी तोफ त्यांनी डागली. पवारांच्या या घणाघाती हल्ल्याला भाजपकडून काही प्रत्युत्तर दिले जाईल, असे वाटले होते. मात्र, पूर्वाश्रमीचे पवारांचे अनुयायी असलेल्या सध्याच्या भाजप नेत्यांनी मौनच बाळगणे पसंत केले. दोन दिवसांनी पालकमंत्री गिरीश बापट एका कार्यक्रमासाठी चिंचवडला आले, तेव्हा पिंपरी पालिकेत अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात आली. पवारांच्या टीकेला थेट पालकमंत्रीच उत्तर देतील, असे सुरुवातीला वाटले होते. मात्र, चिंचवडला येणारच होतो आणि वेळ होता म्हणून ही आढावा बैठक घेतल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या अजित पवार यांना पिंपरी, चिंचवड व भोसरी अशा तीन विधानसभेच्या जागा पुन्हा ताब्यात घ्यायच्या आहेत, त्यासाठी त्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे भाजपचे दोन्ही आमदार अनुक्रमे मावळ व शिरूर लोकसभेसाठी रिंगणात उतरल्यास त्यांच्या विधानसभेच्या जागांवर भाजपकडे तितक्या ताकदीचे उमेदवार नाहीत. तिसरे आमदार गौतम चाबुकस्वार हे मूळचे पवारसमर्थकच आहेत. तीनही ठिकाणी आमदार होण्यासाठी बरेच उत्सुक स्वयंघोषित उमेदवार राष्ट्रवादीकडे आहेत. त्यांच्या मर्यादा स्पष्ट असल्याने अजित पवार यांना रिंगणात उतरण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, भाजप-राष्ट्रवादीचे मधुर संबंध  स्थानिक पातळीवरही आहेत.

पिंपरीच्या राजकारणात दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे व्यवस्थित संगनमत आहे. त्यांचे मार्गदर्शन नव्या कारभाऱ्यांना उपयुक्त ठरते आहे. त्यामुळे संघर्ष करून एकमेकांचे आर्थिक नुकसान करण्यापेक्षा मिळून मिसळून जे काही शक्य आहे, तेच करण्यावर त्यांचा भर आहे. पिंपरी पालिकेत घोटाळे वाढल्याचा मुद्दा पवार यांनी उपस्थित केला. त्यांची सत्ता असताना पालिका धुऊन खाणारे कोण होते, याची त्यांना पुरेपूर माहिती आहे. तूर्त पिंपरी पालिकेत राष्ट्रवादी हाच प्रमुख विरोधी पक्ष असला तरी त्यांचे विरोधाचे राजकारण सोयीचे आहे. त्यामुळेच एकीकडे राष्ट्रवादीकडून ‘हल्लाबोल’ होत असला तरी मांडवली करणारे दुसरे-तिसरे कोणी नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.