राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. “काँग्रेसने जर सत्यजीत तांबेंना उमेदवारी दिली असती, तर असं काही घडलंच नसतं,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. तसेच सत्यजीत तांबेंनी नाईलाजास्तव अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याचंही नमूद केलं. अजित पवार गुरुवारी (२ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “खरंतर माझ्यासारख्या माणसानं काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाबद्दल बोलणं उचित नाही, परंतु एकेकाळी सत्यजीत तांबे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम करत होते. ते पक्षाचा अतिशय जवळचा, बांधिलकी असणारा चेहरा होते.”
“जर सत्यजित तांबेंना उमेदवारी दिली असती, तर असं काही घडलंच नसतं”
“काँग्रेसने जर सत्यजित तांबेंना उमेदवारी दिली असती, तर असं काही घडलंच नसतं. शेवटी नाईलाजास्तव त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहावं लागलं. त्यामुळे नंतरच्या काळात वेगळ्या प्रकारचा निर्णय झाला,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “सत्यजीतसाठी शरद पवारांनी खरगे यांना फोन केला होता, पण…”, अजित पवारांचा मोठा खुलासा
“सत्यजीत तांबेंचं आख्खं घराणं काँग्रेसच्या विचारांचं”
अजित पवार पुढे म्हणाले, “सत्यजीत तांबेंचे वडील, आजोबा यांच्यासह आख्खं घराणं काँग्रेसच्या विचारांचं आहे. त्यामुळे माझा अंदाज आहे की, सत्यजीत तांबे आता आघाडीवर आहेत आणि तेच निवडून येतील. निवडून आल्यावर ते योग्य तो निर्णय घेतील.”
हेही वाचा : ‘कसब्या’ची पोटनिवडणूक ‘राष्ट्रवादी’ने लढविण्यासाठी अजित पवारही सकारात्मक, निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत?
दरम्यान, नाशिकमध्ये सत्यजीत तांबे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत त्यांना १५७८४ मतं मिळाली, तर शुभांगी पाटील यांना ७ हजार ८६२ मतं मिळाली. त्यामुळे सत्यजीत तांबे ७ हजार ९२२ मतांनी आघाडीवर आहेत.