पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस गंभीर नाही. गेल्या चार निवडणुकात काँग्रेसला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला आहे. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसची कसब्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे केली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रही मागणीला अजित पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. पोटनिवडणूक लढविण्यासंदर्भातील निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडलेली भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढे मांडण्यात येणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणुकीबाबतची घोषणा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा >>> कसबा पेठ पोटनिवडणूक: शिवसेना आग्रही असल्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची भावना अजित पवार यांनी गुरुवारी बैठकीत जाणून घेतली. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ता अंकुश काकडे, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार कमल ढोले-पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार उपस्थित होते. या बैठकीत कसबा निवडणूक लढविण्याचा ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. पक्षाच्या ताकदीचे राजकीय गणितही बैठकीत मांडण्यात आले.
काँग्रेसला १९९५, ९९, २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या बैठकीत पराभव पत्कारावा लागला आहे. मतदारसंघातील काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. पोटनिवडणूक लढविण्याबाबत काँग्रेस गंभीर नाही. काँग्रेस निवडणुकीबाबत गंभीर नसल्याने प्रमुख विरोधक असलेल्य भारतीय जनता पक्षाला विजय मिळविणे सहज शक्य आहे. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसची कसब्यात मोठी राजकीय ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनात्मक जाळे येथे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेच पोटनिवडणूक लढविणे योग्य आहे, असे राजकीय गणित या बैठकीत मांडण्यात आले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसने लढवावी, अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवावी, असा ठराव पक्षाच्या बैठकीत एकमताने मंजूर केला होता. प्रवक्ते अंकुश काकडे, ॲड. रुपाली पाटील ठोंबरे, रविंद्र माळवदकर यांच्यासह एकूण पाच इच्छुक उमेदवारांची नावे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसला पाठविण्यात आली आहेत.
कसबा पोटनिवडणूक लढविण्यासंदर्भात बैठकीत भूमिका मांडण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत अजित पवार चर्चा करणार आहेत. त्यानुसार पोटनिवडणूक लढविण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला जाईल.