राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ज्यांना जायचे असेल आणि ज्यांना पक्षात गुदमरल्यासारखे वाटत असेल, त्यांनी खुशाल जावे. कोणालाही धरून ठेवता येणार नाही. मात्र, नगरसेवक म्हणजे सर्वकाही नाही. ते पक्ष सोडून गेले, याचा अर्थ जनता त्यांच्या पाठीमागे जाते, असा होत नाही, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील जनतेवर आपला विश्वास असून विकासाच्या मुद्दय़ावर ते पुन्हा राष्ट्रवादीलाच सत्ता देतील, असा विश्वास व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

िपपरी पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक अजित पवारांच्या उपस्थितीत आकुर्डीत झाली, तेव्हा ते बोलत होते. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापौर शकुंतला धराडे, माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर आझम पानसरे, मोहिनी लांडे, पक्षनेत्या मंगला कदम आदींसह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पवार म्हणाले, पक्षात गटबाजीचे राजकारण आहे. मात्र, गटातटाचा विचार न करता सर्वाना बरोबर घेण्याची भूमिका ठेवली आहे. अनेकांना पदे दिली. मात्र, काहीजण स्वार्थासाठी दुसरीकडे गेले आणि काही जाण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, तरीही पक्षात संभ्रमावस्था नाही. िपपरीच्या राजकारणात १९९१ पासून आहे. तेव्हापासून अनेक निवडणुका लढवल्या, अनेक स्थित्यंतरे पाहिली. शहरातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. शहराचा विकास कोणी केला, हे त्यांना पक्के माहिती आहे. भाजपच्या किंवा राज्याच्या इतर नेत्यांना िपपरी-चिंचवडविषयी आस्था नाही. ते निवडणुकीपुरते येतात. मी दर दोन महिन्यांनी येथे असतो. आगामी निवडणुकीत समविचारी पक्षाशी निवडणूकपूर्व आघाडी करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक नेत्यांचा कल पाहून घेतला जाईल. जातीयवादी पक्षांना फायदा होऊ नये, मतविभागणी टाळावी, अशी आपली भूमिका आहे.

‘भाजपमध्ये जाऊनही जगतापांना किंमत नाही’

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर अजित पवार यांनी पुन्हा तोफ डागली. राष्ट्रवादीने त्यांना सर्व काही दिले. मात्र, स्वार्थासाठी ते दुसरीकडे गेले. भाजपच्या लोकांना मंत्रिपदे मिळत नाहीत, आहे त्यांची पदे जात आहेत. मग, यांना कोण मंत्री करणार. भाजपमध्ये जाऊनही त्यांना किंमत नाही. ‘टीडीआर’ शिवाय त्यांना काही दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. भाजप खासदार अमर साबळे यांनी देहू-आळंदी व पंढरपूरमध्ये दारूबंदी करण्याच्या मागणीविषयी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवारांनी फारसे महत्त्व दिले नाही.

िपपरी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. गेली २५ वर्षे शहराचे राजकारण करतो आहे. मी कुठेही भूखंड घेतला नाही. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र तो घेतला. मला तसा भूखंड घेता येऊ शकला नसता का?

– अजित पवार

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar gave warning to ncp leaders
First published on: 10-06-2016 at 03:38 IST