‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे घराची पडझड होऊन त्यात मृत्यू पावलेल्या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाहागाव येथील मृत मायलेकाच्या वारसांना पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. पवार यांनी या भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौराही केला.

चक्रीवादळाचा बळी ठरलेल्या मंजाबाई अनंता नवले (वय ६५) आणि नारायण अनंता नवले (वय ३८) या माललेकाच्या वारसांना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. आज सकाळपासून अजित पवार हे चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करत आहेत.

पुण्याच्या खेड तालुक्यातील वाहगाव येथे ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा जोर जास्त होता. पाऊस आणि वादळाचा येथील घरांना तडाखा बसला असून घराची भिंत कोसळून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. घटनेत काही जण जखमी ही झाले होते. तर मंजाबाई आणि त्यांचा मुलगा नारायण नवले यांचा मृत्यू झला होता. या घटनेनंतर अवघ्या गावावर शोककळा पसरली होती.

दरम्यान, परिस्थतीचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीचा धनादेश मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, खेडचे उप विभागीय अधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल आदी अधिकारी उपस्थित होते.