पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने आतापर्यंत ५५९ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. महापालिकेचे ‘एए प्लस क्रेडिट रेटिंग’ पत मानांकन आहे, असा दावा महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी केला आहे.
भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेवर असलेल्या कर्जाची माहिती मागविली होती. त्यांना लेखी पत्राद्वारे महापालिकेने माहिती दिली आहे. कासारवाडीतील नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपूल बांधण्यासाठी १५९ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. ते कर्ज ३० वर्षांसाठी आहे. त्यापैकी ९१ कोटी ९० लाख रुपयांची परतफेड करण्यात आली आहे.
मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी चार वर्षे कालावधीसाठी म्युन्सिपल बॉण्डद्वारे २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यापैकी ९० कोटी रुपयांची परतफेड केली आहे. हरित सेतू आणि टेल्को रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिजाईनद्वारे सुशोभिकरण करण्यासाठी हरित कर्जरोखेद्वारे २०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले आहे. त्याचा कालावधी पाच वर्षे आहे. त्यापैकी १३ कोटी ५० लाख रुपयांची परतफेड करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ३६४ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज फेडणे बाकी आहे. ते खर्च केंद्र व राज्य शासनाची परवानगी घेऊनच काढण्यात आल्याचे लेखा विभागाने म्हटले आहे.
कर्जाचे हप्ते नियमितपणे अदा केले जात असून, कर्ज व व्याज परतफेडीकरिता महापालिका आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आहे. क्रिसील व केअर या क्रेडिट रेटिंग संस्थेने महापालिकेस एए प्लस स्टेबल क्रेडिट रेटिंग पत मानांकन दिले आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा दावाही जैन यांनी केला आहे.
अजितदादांचा आदेश आणि भाजप आमदाराने मागविली माहिती
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी विकास कामाच्या नावावर महापालिकेला कर्जबाजारी केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. यात किती तथ्य आहे, याची माहिती काढण्याची सूचना उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिली होती. तसेच महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना मी एक रुपयाही कर्ज होऊ दिले नाही, अशी टिप्पणी केली. आगामी महापालिका निवडणुकीत कर्जाचा मुद्दा राजकीय होऊ शकतो हे लक्षात येताच भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाकडे लेखी माहिती मागवली. प्रशासनाने तत्काळ आमदार लांडगे यांना माहिती दिली.
