पिंपरी-चिंचवडमध्ये अतिशय वेगाने नागरिकीकरण होत आहे. शहराची अनियंत्रित वाढ होत राहिल्यास आगामी काळात बकालपणा येईल आणि परिस्थिती हाताबाहेर  जाईल, या हेतूने यापुढे विस्तार नको, अशी भूमिका ‘कारभारी’ व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. आपल्याला आता जास्त वाढायचे नाही, असे मत त्यांनी सांगवीत पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांच्या साक्षीने मांडले.
पिंपरी महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये व्यवस्थित कामे झाली पाहिजे तसेच मूळ शहरवासीयांनाही आपल्याकडे दुर्लक्ष होते आहे, असे वाटता कामा नये. रावेतच्या पुढे गहुंजेचा परिसर पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम कुठे आहे तर ते पिंपरी-चिंचवडमध्ये आहे, अशी शहराची ओळख व्हायला हवी. आपल्याला आता जास्त वाढायचे नाही. हमरस्त्यावर गहुंजे स्टेडियमपर्यंत आणि तिकडे नदीपर्यंत विस्तार ठीक आहे, असे विधान अजितदादांनी सांगवीच्या सभेत केले. काही महिन्यांपूर्वी, नव्याने २० गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव होता. देहू, आळंदी, चाकण, िहजवडी, विठ्ठलनगर, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, खालुंबरे, गहुंजे, माण, मारूंजी, नेरे, जांबे ही गावे पालिकेत येणार होती. मात्र, तीव्र विरोध झाल्याने प्रस्ताव बारगळला. त्यानंतर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असलेले गहुंजे आणि ‘आयटी हब’मुळे जगाच्या नकाशावर आलेले हिंजवडी या महत्त्वाच्या गावांसह लगतची पाच गावे समाविष्ट करण्याचा ‘सुधारित’ निर्णय झाला, त्याविषयी शासनदरबारी प्रक्रिया सुरू आहे.
चार गावांची मिळून मार्च १९७० ला पिंपरी नगरपालिका स्थापन झाली. जानेवारी १९७५ ला ‘अ’ दर्जा मिळाला. ऑक्टोबर १९८२ ला नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. १९८२ ला पहिली हद्दवाढ झाली. सप्टेंबर १९९७ मध्ये हद्दीलगतच्या १४ गावांचा समावेश महापालिकेत झाला. आता आणखी सात गावे पालिकेत येण्याच्या मार्गावर आहेत. १९७० मध्ये शहराची लोकसंख्या ८३ हजार होती. १९८१ मध्ये अडीच लाख, १९९१ मध्ये सव्वापाच लाख, २००१ मध्ये दहा लाख लोकसंख्या होती. २०११ मध्ये लोकसंख्येचा आकडा १७ लाखांच्या पुढे गेला. सद्य:स्थितीत शहराने २० लाखांची लोकसंख्या गाठली आहे. यापुढे शहराची अनियंत्रित वाढ होऊ नये, यासाठीच ‘जास्त वाढायचे नाही’ असा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंजवडीत साखर कारखाना नियोजित होता
‘आयटी पार्क’ म्हणून जगाच्या नकाशावर हिंजवडी असले तरी प्रत्यक्षात तेथे साखर कारखाना होणार होता. मात्र, शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी कारखान्याचे संस्थापक नाना नवले यांना दुसरी जागा निवडण्याची सूचना केली. त्यानुसार, नवलेंनी कासारसाईला कारखाना नेला आणि हिंजवडीत आयटी पार्क झाले, अशी माहिती अजित पवार यांनी या वेळी बोलताना दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar opposes for extention of pcmc
First published on: 23-01-2016 at 03:21 IST