पिंपरी -चिंचवड: गुजरात मधील नेते महाराष्ट्रात येऊन शरद पवारांवर टीका करतात हे लोकांना पटत नाही. महाराष्ट्रात कुणीही येऊ द्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा, आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सत्तेपासून कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वास शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रोहित पवारांनी पिंपरी- चिंचवड मधील मिसळचा आस्वाद घेतला. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, पदाधिकारी विशाल वाकडकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवारांवर अमित शहा यांनी टीका करताच अजित पवारांच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले तर आनंदच असं देखील म्हटलं होतं. यावर रोहित पवार यांनी स्पष्ट मत व्यक्त करत लोकसभा संपली आहे. त्याआधी अजित पवारांच्या आमदारांनी भूमिका घेतली असती तर आम्ही समजू शकलो असतो. परंतु, विकास व्हावा म्हणून अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले. शरद पवार यांनी निवृत्त व्हावं अशी टीका देखील त्यांनी केली होती. आता विधानसभा निवडणुका असल्याने दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं असं अजित पवारांच्या आमदारांना वाटत असलं तरी यावर शरद पवार हे निर्णय घेतील. पुढे ते म्हणाले, निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणायचं असल्याचं शरद पवारांनी ठरवलं आहे, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांच्या आमदारांना उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : पुणे: तळेगाव गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; ४ पिस्तुल अन् १२ जिवंत काडतुसे जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या अजित पवार हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या बद्दल फार काही टीका करताना दिसत नाहीत. यावरून देखील रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांवर जास्त काही बोललेलं लोकांना आवडत नसल्याने अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बद्दल काही बोलणं बंद केलं आहे. अन्यथा ते त्यांच्यावर बुमरँग होऊ शकतं, याचा फटका मतांमध्ये बसू शकतो. अशी शक्यता वर्तवली असल्याने अजित पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंबद्दल बोलत नसतील, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.