बारामती : ‘करमाळा तालुक्यातील कुर्डू या गावात अवैध उत्खननासंदर्भात कारवाईसाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी मोबाइलवर केलेल्या संभाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार हे चुकीचे बोलले,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते, अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी केले.
युगेंद्र पवार यांनी बारामतीत मंगळवारी जनता दरबार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘कोणालाही अशा प्रकारचे संभाषण आवडणार नाही. मलाही ते आवडले नाही. महिला अधिकाऱ्यांशी बोलताना काय बोलत आहोत, हे पाहिले पाहिजे. झाले ते चुकीचे झाले.’
अजित पवारांच्या विरोधात बारामतीत विधानसभा निवडणूक लढविणार नाही, असे वक्तव्य एका खासगी मुलाखतीत दाखविण्यात आले. याबाबत युगेंद्र पवार म्हणाले, ‘याबाबत अर्धवट वक्तव्यावर चर्चा करण्यात आली. कुटुंबात निवडणूक झाली आणि कुटुंब वेगळे झाले, याबाबत काय वाटते, असे विचारण्यात आले होते. तेव्हा कोणालाही ते आवडत नाही.
आम्हाला त्याचा त्रास झाला. असले राजकारण थांबले पाहिजे, असे म्हणालो. मात्र, त्याऐवजी एकाच वाक्याचा विपर्यास करण्यात आला.’ ‘मी काम करत राहणार आहे. बारामती सोडून जाणार नाही. बारामती माझे घर आहे. माझे काम पाहून लोकच मला निवडणुकीला उभे करतील आणि निवडून देतील, असे मी म्हणालो होतो.’ असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.