पिंपरी चिंचवड: आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये उद्या (रविवार) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा पहाटे सहा ते आठ च्या दरम्यान दौरा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयटी हब असलेल्या हिंजवडीमधील रस्त्यांची दुरावस्था झाल्याची वारंवार ओरड आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील स्वतः हिंजवडीमधील रस्त्यांची पाहणी करत स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. वेळीच तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंजवडीचा दौरा करणार आहेत.
मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने हिंजवडीमधील रस्त्यांची पोलखोल केली होती. ड्रेनेज आणि रस्त्यांची दुरावस्था झाल्याने आयटी हब असलेली हिंजवडी पाण्यात बुडाली होती. आयटी पार्क हिंजवडीची बदनामी झाल्याचा आरोप आयटी अभियंत्यांनी केला. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत हिंजवडी ग्रामपंचायत समाविष्ट करण्याबाबत आयटी अभियंत्यांनी सह्यांची मोहीम देखील घेतली.
यानंतर सरकारला जाग आली, त्यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक आमदारांची बैठक घेतली. बैठकीत उपमुख्यमंत्री यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं होतं. आयटी पार्क असलेल्या हिंजवडीच्या सध्याच्या स्थितीला अधिकारी जबाबदार असल्याचं अजित पवार यांनी अधोरेखित केलं होतं. आता उद्या रविवारी सकाळी सहा वाजता धावता दौरा करणार आहेत.
आठ वाजता आकुर्डी येथील पीएमआरडी ऑफिसमध्ये बैठक घेण्यात येणार आहे. हिंजवडी ग्रामपंचायत पीएमआरडीएमध्येच राहील अशी शक्यता वारंवार वर्तवली जात आहे. अजित पवारांच्या दौऱ्यानंतर तरी हिंजवडीमधील रस्त्यांची दुरावस्था सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.