scorecardresearch

…अन् ‘त्या’ प्रकारावर अजित पवारांनी थेट हातच जोडले

सभेदरम्यान कार्यकर्ते अजित पवारांकडे एक मागणी घेऊन आले होते. अजित पवारांनी हात जोडत ती मागणी पूर्ण करण्यास नकार दिला.

…अन् ‘त्या’ प्रकारावर अजित पवारांनी थेट हातच जोडले

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या शहरात पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कसबा मतदारसंघात सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. मात्र, या सभेदरम्यान असा एक प्रकार घडला ज्यामुळे अजित पवारांना हात जोडावे लागले.

हेही वाचा- चिंचवड पोटनिवडणूक: महाविकास आघाडी, भाजपा आणि अपक्ष उमेदवाराने फोडला प्रचाराचा नारळ

सभेला सुरुवात झाल्यावर काही कार्यकर्ते व्यासपीठावर काळे फुगे आणि त्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो घेऊन आले होते. ते फुगे अजित पवार यांच्या हस्ते हावेत सोडून निषेध नोंदविला जाणार होता. ते फुगे सोडले जावेत, अशी विनंती कार्यकर्त्यांनी अजित पवारांना केली. त्यावर अजित पवार यांनी थेट हात जोडत नकार दिला. अखेर पोलिसांनी व्यासपीठावर येत फुगे ताब्यात घेतले.

हेही वाचा- कसबा विधानसभा पोटनिवडणूक : अजित पवार यांच्या भाषणावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

महापुरुषांबद्दल सतत वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान केल्याने मागील काही महिन्यापासून ते चर्चेत राहिले होते. कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन देखील झाली होती. तसेच कोश्यारी यांना पदमुक्त करावे, अशी मागणी विरोधी पक्षांसह अनेक संघटनांनी केली होती. अखेर कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देत या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकला आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर रमेश बैस हे आता महाराष्ट्रचे राज्यपाल होणार आहे. भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राज्यातील अनेक संघटनांनी प्रतिक्रिया जल्लोष देखील साजरा केला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 21:35 IST