पुणे : शाळा सुरू होण्यापूर्वीच्या शेवटच्या रविवारी पुणेकरांच्या पावलांनी रंगमंदिराची वाट धरली. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील नाट्यगृहांमध्ये झालेल्या सर्व नाट्यप्रयोगांनी हाऊसफुल्लचा फलक अनुभवला. विनोदी, सामाजिक आणि वेगळे काही सांगू पाहणाऱ्या अशा वेगवेगळ्या धाटणीच्या नाटकांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे रविवार हा पुणेकरांसाठी नाटकवार ठरला. नाट्यगृहांतील असुविधांची चर्चा सुरू असताना पुणेकरांनी मात्र नाटक पाहण्याला पसंती दिली.

बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी साडेबारा वाजता ‘आमने सामने’, सायंकाळी साडेपाच वाजता ‘भूमिका’ आणि रात्री साडेनऊ वाजता ‘शिकायला गेलो एक’ या नाटकांचे प्रयोग झाले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी साडेबारा वाजता आणि कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये रात्री साडेनऊ वाजता असे ‘संगीत देवबाभळी’ नाटकाचे दोन प्रयोग झाले. हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात दुपारी साडेबारा वाजता ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि टिळक स्मारक मंदिर येथे दुपारी साडेबारा वाजता ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाचा प्रयोग झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द. मा. मिरासदार यांच्या ‘व्यंकूची शिकवणी’ या कथेवर आधारित ‘शिकायला गेलो एक’, स्मृतिभ्रंश हा विषय हाताळणारा ‘असेन मी नसेन मी’, रखुमाई आणि आवली यांच्यातील संवादात्मक ‘संगीत देवबाभळी’ यांसारखी वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी करणारी नाटके अशा सर्वच नाटकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दीड महिन्यापासून नाटकांना चांगले दिवस आले असून, मनोरंजनाची विविध माध्यमे असतानाही नाटकाच्या रूपाने जिवंत कला अनुभवण्याकडे पुणेकरांचा कल दिसून येत आहे. – समीर हंपी, नाट्य व्यवस्थापक