विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यंदा अनेक जागांवर दिग्गजांचं भवितव्य पणाला लागलं आहे. पुण्यातील आठही जागांवर यंदा भाजपाचे उमेदवार आहेत, कोथरुडच्या जागेवर चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या जागेमुळे यंदा चांगलच राजकारण तापलं होतं. मात्र आज या धामधुमीमधून, मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने, कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी इडली सांबर आणि चहा नाष्टा घेत चर्चा घडवुन आणली. प्रचारा दरम्यान एकमेकावर नेहमी टीकेची झोड उठविणारे, लोकप्रतिनिधी सकाळच्या वेळेमध्ये निवांत बसलेले पुणेकरांना पहायला मिळाले.

कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार महापौर मुक्ता टिळक, मनसेचे उमेदवार शहर अध्यक्ष अजय शिंदे आणि काँग्रेस पक्षांकडून प्रवक्ते गोपाळ तिवारी हे तिघेजण सहभागी झाले होते. मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी सारसबागेशेजारील हॉटेल विश्व येथे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, “पुणे जिल्ह्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालकिल्ला राहीला असून या मतदारसंघातून गिरीश बापट हे २५ वर्ष सलग निवडून आले आहेत. आता ते खासदार झाल्याने, मला निवडणूक लढविण्याची संधी पक्षाकडून मिळाली. गिरीश बापट यांची परंपरा कायम ठेवत, यंदाच्या निवडणुकीत नागरिक मला प्रचंड मतांनी निवडून आणतील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या दरम्यान उमेदवाराची चर्चा घडवुन आणल्याने, समाजात चांगला संदेश देण्याचे काम केले आहे. अशा उपक्रमाची गरज असल्याची भावनाही टिळक यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अजय शिंदे म्हणाले की, “विधानसभेची निवडणूक प्रथमच लढवित असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मागील २५ वर्षापासुन कसबा मतदारसंघ भाजपचा बालकिल्ला राहीला आहे, मात्र या काळात भाजपकडून कोणत्याही प्रकारचा विकास करण्यात आला नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहण्यास मिळत आहे. या निवडणुकीत मी निश्चित विजयी होईन”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण नेहमीच प्रचारा दरम्यान पक्षाची ध्येय धोरणे मांडत असतो, पण अशा चर्चेतून अनेक मुद्दे पुढे येण्यास मदत झाल्याचं शिंदेंनी सांगितलं.

यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले की, “केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपचा सत्ता आली आहे. नागरिकांनी बहुमत देऊन, देखील विकास कामे करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. तसेच पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालकिल्ला राहीला असून विकास केला जाईल, एवढीच आश्वासने देण्याचे काम केले आहे. यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष पाहण्यास मिळत आहे. याच दरम्यान पुण्यातील आठ ही विधानसभा मतदारसंघ भाजपला दिले गेले आहे. यामुळे भाजप आणि सेनेत मतभेद पाहण्यास मिळत आहे.” याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार असून शहरातील आमच्या जागा निश्चित निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २१ तारखेला मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.