माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची बतावणी करुन बांधकाम ठेकेदाराकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकास खंडणी विरोधी पथकाने पकडले. दत्तात्रय गुलाबराव फाळके (वय ४६, रा. मानसिंग रेसिडन्सी, तळजाई पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ठेकेदाराने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार राष्ट्रीय महामार्गाचे काम करतात. नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात तक्रारदाराच्या कंपनीकडून रस्त्याचे काम करण्यात येत आहे. आरोपी फाळके ठेकेदाराला भेटला. तुमच्या कंपनीकडून बेकायदा उत्खनन करण्यात आले आहे. परवानगी घेण्यात आल्या नाहीत तसेच उत्खननाचे शुल्क भरण्यात आले नाही. दंडात्मक कारवाई टाळायची असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी फाळकेने त्यांना दिली. फाळकेने माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची बतावणी करुन ठेकेदाराला धमकावण्यास सुरूवात केली.
त्यानंतर ठेकेदाराने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे तक्रार दिली. पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर सापळा लावला. ठेकेदाराने खंडणीचा पहिला हप्ता घेण्यासाठी फाळकेला कदम प्लाझा इमारतीजवळ बाेलावले. ठेकेदाराकडून २५ लाखांची खंडणी घेताना फाळकेला पकडण्यात आले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहन जाधव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, विजय गुरव, अमोल पिलाणे, सचिन अहिवळे आदींनी ही कारवाई केली.