पुण्याच्या दांडेकर पुलाजवळच्या आंबिल ओढा परिसरात गेल्या आठवड्यात अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अनेक घरं जमीनदोस्त करण्यात आली. मात्र, न्यायालयानेच स्थगिती आणल्यानंतर सकाळी सुरू झालेली कारवाई दुपारी थांबली. या भागाला आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कारवाई झालेल्या घरांची पाहणी केली. तसेच कुटुंबीयांची देखील भेट घेतली. मात्र, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पुणे महानगर पालिकेवर, पुण्याच्या पोलीस आयुक्तांवर आणि राज्य सरकारवर देखील टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्यथा मानवी हक्क आयोगात जाणार!

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी वेळीच कारवाई न झाल्यास मानवी हक्क आयोगात पुणे पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार करणार असल्याचा इशारा दिला. “अंबिल ओढा येथील घरांवरील कारवाई लक्षात घेता, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी, कोण कुणाच्या पाठीमागे आहे हे न बघता संबंधित बिल्डरवर कारवाई केली पाहिजे. अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाऊ”, असं ते म्हणाले.

“न्यायालयाची स्थगिती येईपर्यंत घर भुईसपाट झालं होतं”; आंबिल ओढा कारवाईतील कुटुंबाची कहाणी!

आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी

दरम्यान, आंबिल ओढा कारवाईवर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी विद्यमान गृहमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. “गृहमंत्री तटस्थ राहून काही करतील याविषयी मला शंका आहे. पण आता मुख्यमंत्र्यांना चौकशीचा अधिकार आहे. त्यांनी ती चौकशी करावी”, असं ते म्हणाले. तसेच, “घरं पाडण्यामध्ये आणि लोकांना घरातून काढण्यामध्ये पोलीस अॅक्टिव्ह रोल प्ले करत आहेत. पोलिसांना फक्त बंदोबस्त करण्याचा अधिकार आहे. तोडफोड करण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की जुलैअखेर पर्यंत पुणे-पिंपरी चिंचवड भागामध्ये कोणतंही बांधकाम पाडायचं नाही. हा निर्णय असताना पुणे महानगर पालिका किंवा आयुक्त त्याचं उल्लंघन कसं करतात?” असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambil odha encroachment action vba chief prakash ambedkar visits site svk pmw
First published on: 28-06-2021 at 22:37 IST