तातडीच्या व गंभीर प्रसंगी अत्यावश्यक ठरणाऱ्या रुग्णवाहिकेच्या भाडय़ाचा विषय अनेकदा दुर्लक्षित राहिला आहे. बहुतांश रुग्णावाहिका चालकांकडून रुग्णांच्या नातलगांकडून मनमानीपणे भाडय़ाची वसुली केली जाते. प्रसंग दु:खद असल्याने या गोष्टीची वाच्यता न करता अनेक जण मनमानी भाडेआकारणीला बळी पडतात. या सर्वावर पर्याय म्हणून दोन वर्षांपूर्वी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रुग्णवाहिकांसाठीही भाडेपत्रक ठरवून दिले. मात्र, प्रत्यक्षात हे भाडेपत्रक कागदावरच राहिले असून, त्याची कुठेच अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते आहे.
रुग्णवाहिकेच्या व्यवस्थेची गरज निर्माण होईल, अशी वेळ खरेतर कुणावरही येऊ नये. मात्र, कुठलाही प्रसंग सांगून येत नसल्याने कुणालाही व कधीही रुग्णवाहिकेच्या गरज लागू शकते. अशा तातडीच्या वेळी रुग्णवाहिकेची सेवा घेतल्यास अगदी कमी अंतरापर्यंतही काही हजार रुपये उकळले जात असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. रुग्णाला तातडीने रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकेची त्या वेळी गरज असल्याने रुग्णालयाचे नातलगही मनमानी भाडेआकारणीला बळी पडतात. मात्र, त्यातून काही रुग्णवाहिका चालकांचे चांगलेच फावत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
रुग्णवाहिकेच्या भाडय़ाबाबत होणाऱ्या तक्रारींकडे सजग नागरिक मंचच्या वतीने काही वर्षांपूर्वी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे लक्ष वेधले होते. काही तक्रारीही प्राधिकरणासमोर मांडण्यात आल्या होत्या. शहरात धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचे भाडे प्राधिकरण ठरविते. त्याप्रमाणे रुग्णवाहिकेचे दरपत्रकही ठरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्राधिकरणाने रुग्णवाहिकांच्या सेवेचा अभ्यास केला व त्यानंतर झालेल्या बैठकीत २१ ऑगस्ट २०१३ रोजी रुग्णवाहिकांसाठी भाडेपत्रक जाहीर केले. मात्र, प्राधिकरण केवळ भाडेपत्रक तयार करून थांबले, त्यापुढे काहीही झाले नाही.
आजही बहुतांश रुग्णवाहिकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. भाडेपत्रकाचा आधार कुठेही घेतला जात नाही. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही कारवाईही कोणतीही मोहीम राबविण्यात आलेली नाही. प्राधिकरणाने ठरविलेले भाडेपत्रक प्रत्येक रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्याचेही बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येते.
असे आहे रुग्णवाहिकांचे दरपत्रक
रुग्णवाहिकेचा प्रकार– २५ किमी किंवा दोन तासांकरिता भाडे– प्रती किमी भाडे
– मारुती व्हॅन————२५० रुपये————————९ रुपये
– टाटा सुमो व मॅटॅडोर——-३०० रुपये———————–१० रुपये
– टाटा ४०७, स्वराज माझदा—५०० रुपये————————१२ रुपये
– आयसीयु व वातानुकूलित—७०० रुपये————————२० रुपये