पुणे : मुघल आणि परकीय आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या मंदिर पुनर्निर्माणाचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांच्यानंतर अनेक शासकांनीही ही परंपरा पुढे नेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच परंपरेला पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले.महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे नऱ्हे-आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाअंतर्गत सरकारवाडय़ाचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम केले.
गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराचे काम त्यांनी केले. याच मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. शिवाजी महाराज यांच्यानंतर अहिल्याबाई होळकर आणि पेशव्यांनी ही परंपरा कायम ठेवली. ही परंपरा मोदी सरकारमध्येही कायम असून काशी विश्वेश्वर मंदिर, सोमनाथ मंदिर, अयोध्या मंदिराची उभारणी ही त्याची उदाहरणे आहेत, असे शहा यांनी सांगितले. शहा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन अत्याचाराविरोधात विद्रोह करण्याचे, स्वधर्मासाठी संघर्ष करण्याचे, स्वराज्य स्थापित करण्याचे होते. राज्याचा उद्देश हा लोककल्याणसाठी आहे, हा संदेश त्यांनी आपल्या मुद्रेद्वारे दिला आहे.