गेल्या काही महिन्यांपासून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. अमोल कोल्हेंनी या चर्चा फेटाळल्या आहेत. त्यातच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंबद्दल सूचक विधान केलं आहे. अमोल कोल्हे भाजपात आले, तर चांगलीच गोष्ट आहे, असं आढळराव पाटलांनी म्हटलं.

आढळराव पाटील नेमकं काय म्हणाले?

“अमोल कोल्हे भाजपात आले, तर चांगलीच गोष्ट आहे. आमच्या दृष्टीने शिवसेना-भाजपा युती वाढणं महत्वाचं आहे. अमोल कोल्हे कोणत्या मतदारसंघातून उभे राहतात, त्यावर मी त्यांचा प्रचार करणं अवलंबून आहे,” असं आढळराव पाटील म्हणाले.

हेही वाचा : “शरद पवार आणि अजित पवार हे दिसायला वेगवेगळे, पण…”, भाजपा आमदाराचं सूचक वक्तव्य

यावर आता अमोल कोल्हे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अमोल कोल्हेंनी यावरती भाष्य केलं आहे. “शिवाजीराव आढळराव पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. आढळराव पाटील यांच्याशी शेवटची भेट शिवनेरीवर झाली होती. १७ तारखेला सविस्तर यावर बोलेन,” असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.

“शरद पवार विचारअंती निर्णय घेतील”

“पदावरून पायउतार होण्यामागील शरद पवारांच्या भावना समजून घेणं महत्वाचं आहे. गेले सहा दशके महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारांभोवती फिरत आहे. ते विचाराअंती याबाबत निर्णय घेतील,” अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी शरद पवारांच्या निवृत्तीवर दिली आहे.

हेही वाचा : शरद पवार यांनी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं तर होणार का? अजित पवार स्पष्टच म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर शिवसेना शिवसेना आहे”

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र आले, तर तुमच्या शिवसेनेचं काय होईल?” असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने आढळराव पाटलांना विचारल्यावर ते म्हणाले, “असं काही होईल, हे मला वाटत नाही. झालं तर शिवसेना शिवसेना आहे. एकनाथ शिंदेंची स्वतःची ताकद आहे. भाजपा आम्हाला सोडून असं काही करेल हे वाटत नाही. आम्ही सगळे एक आहोत. झालं तरी आम्हाला काही अडचण नाही.”